
सामना ऑनलाईन । मुंबई
मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आणि पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ती & ती’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच डिजीटल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. सुरुवातीला ‘ती’ आणि ‘ती’ कोण असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता पण काही दिवसांअगोदरच रिलीझ झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमधून प्रेक्षकांना याचे उत्तर मिळाले आहे.
या अर्बन रोमँटिक कॉमेडी चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांची लीड भूमिका आहे हे सर्वांना ठाऊक झाले आहे. पण चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याविषयी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच कुतुहल तयार झाले असेल. तसेच दिग्दर्शिका म्हणून मृणाल कुलकर्णी यांचा हा तिसरा मराठी चित्रपट आहे, त्यामुळे पण या चित्रपटाची आतुरता अनेकांना हमखास असणार. आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. पुष्कर जोग, आनंद पंडीत, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत. ‘ती & ती’ चित्रपट येत्या 1 मार्च 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.




























































