
कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपले अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. वेळीच निदान व योग्य उपचार पद्धतीने कॅन्सरवर यशस्वीरीत्या मात करता येते हे अनेकांनी दाखवून दिले आहे. कॅन्सरवर यशस्वीपणे मात केलेल्या व्यक्तींकडून कॅन्सर रुग्णांना नेमका हाच संदेश देण्यासाठी आज ‘कॅन्सर सर्व्हायव्हर डे’ साजरा होत आहे.
दरवर्षी जून महिन्यातील पहिला रविवार हा ‘कॅन्सर सर्व्हायवर डे’ म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. म्हणूनच उद्या रविवार, 5 जून रोजी मुंबईसह सर्व राज्यांत हा दिवस साजरा होत आहे. कॅन्सरवर यशस्वीपणे मात करणाऱया कॅन्सर योद्धय़ांसाठी ‘कॅन्सर सर्व्हायव्हर डे’ साजरा होतो. यानिमित्त टाटा कॅन्सर रुग्णालयात ‘होप’ तर इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने रविवारी ‘उगम’ हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केला आहे.
या पार्श्वभूमीवर टाटा मेमोरियल सेंटरचे शैक्षणिक संचालक (प्रकल्प) डॉ. कैलाश शर्मा यांनी या दिवसाचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले की, लोकांमध्ये कॅन्सरची भीती आहे. कॅन्सर म्हणजे सर्व संपले अशी परिस्थिती आता नाही. आता कॅन्सरचे वेळेत निदान झाले, योग्य ठिकाणी उपचार केलेत तर उपचार व्यवस्थित होतात आणि आता कॅन्सरवर मात करून बाहेर पडण्याचे प्रमाण व शक्यता खूप वाढली आहे.
रुग्णाला धीर देणारे शब्द
समजा एखाद्या रुग्णालयाच्या ओपीडीत दहा रुग्ण बसले असतील आणि त्यांच्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वी उपचार घेणाऱया व्यक्ती असतील तर अशा व्यक्ती नव्यानेच कॅन्सरचे निदान झालेल्या रुग्णांना धीर देतात. मला पाच-दहा वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. आता मी बरा झालो आहे. तूही घाबरू नको, अशा शब्दांत धीर देतात आणि धीर देणारे हेच शब्द महत्त्वाचे असतात, याकडे डॉ. शर्मा यांनी लक्ष वेधले.
अभ्यास होणे गरजेचे
गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे, पण तीस वर्षांपूर्वी काही महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्या काळात फार आधुनिक उपचार नव्हते. शस्त्र्ाक्रिया व रेडिएशन हे दोनच प्रामुख्याने उपचार होते, पण तरीही त्यांनी यशस्वीपणे कॅन्सरवर मात केली आहे. ते कशामुळे त्याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.
ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. यात दुर्दैवाने काही मृत्यू होतात. पण सध्या आधुनिक उपचार पद्धतीमुळे कॅन्सरवर मात करण्याऱयांचे प्रमाण अधिक आहे.
– डॉ. कैलाश शर्मा,
डीन, प्रोजेक्ट टाटा मेमोरियल सेंटर
































































