टॉर्चमनची प्रकाशवाट!

सिनेमागृहातल्या टॉर्चमनचा त्याच थिएटरमध्ये नायक म्हणून सिनेमा लागणं ही मोठीच गोष्ट. प्रचंड मेहनतीच्या बळावर संदीप साळवे याने ते शक्य करून दाखवले. 2003 साली चेंबूरच्या अमर चित्रपटगृहात टॉर्चमन असलेल्या संदीपचा ‘रॉकी’ हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय.

सिनेमागृहात टॉर्चमन असलेल्या तरुणाच्या मनात मोठ्ठा अभिनेता व्हायचं स्वप्न असणं स्वाभाविक आहे. पण प्रचंड जिद्द आणि मेहनतीच्या बळावर ते शक्य करून दाखवणारे फारच थोडे असतात. अभिनेता संदीप साळवे हा त्यातलाच एक. त्याने अभिनय क्षेत्रात यायचं ठरवलं होतं. अदनान शेख हा संदीपचा मित्र. त्याने आपली कल्पना अदनानला सांगितल्यावर अदनानलाही ती आवडली. मग अदनानने पूर्ण पटकथा लिहूनच संदीपसमोर ठेवली. त्यालाच नजरेसमोर ठेवूनच अदनानने ती पटकथा लिहिली होती. अशा प्रकारे ‘रॉकी’ हा सिनेमा आकाराला आला. 2017मध्ये शूटिंग सुरू होऊन 2018मध्ये तो पूर्ण झाला. आता या शुक्रवारी 8 मार्चला तो प्रदर्शितही होतोय.

एका सिनेमागृहातल्या टॉर्चमनचा त्याच थिएटरमध्ये नायक म्हणून सिनेमा लागणं ही मोठीच गोष्ट आहे. याबाबत बोलताना संदीप म्हणतो, हो. तो एक इतिहासच झाला. 2003 साली मी जेव्हा मुंबईत आलो, तेव्हा कॉलेजला असताना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब केले. पार्ट टाइम. त्यातच एक चेंबूरच्या अमर सिनेमागृहात टॉर्चमन म्हणूनही वर्षभर काम केलं. पुढे हाऊसकिपींग, कम्पाऊंडर अशी छोटी छोटी कामंही त्याच दरम्यान केली. नंतर बॉडीबिल्डिंग क्षेत्रात आलो. त्यात ट्रेनर म्हणूनही काम केलं. एका जीममध्ये मॅनेजर म्हणून काम केलं. आता माझी स्वतःची जीम सुरू केली आहे. हा प्रवास टॉर्चमनपासूनच सुरू झाला आणि त्याच अमर चित्रपटगृहात मी नायक असलेला सिनेमा प्रदर्शित होतोय. खूप भावनात्मक गोष्ट आहे ही माझ्यासाठी.

संदीपची प्रमुख भूमिका असलेला ‘रॉकी’ हा एक रिव्हेंज ड्रामा आहे. ‘गझनी’, ‘अग्निपथ’ अशा हिंदी सिनेमांमध्ये हा रिव्हेंज ड्रामा आपण पाहिला आहेच, पण हिंदीतील तुफान हाणामारी ‘लय भारी’ किंवा ‘माऊली’ वगळता मराठी सिनेमात आजवर दिसलेली नाही. हिंदीतील हार्डकोर ऍक्शन्स दाखवण्याचाच आपला प्रयत्न असल्याचं संदीप सांगतो. तो पुढे स्पष्ट करताना म्हणतो की, ‘रॉकी’चा दिग्दर्शक अदनान शेख हा ‘बागी-2’ सिनेमाचा सहायक दिग्दर्शक होता. त्यामुळे त्याला अशा प्रकारच्या सिनेमाचा अनुभव होता. म्हणून ‘बागी-2’च्या लेव्हलची ऍक्शन्स आम्ही केली आहेत. दुसरं म्हणजे या सिनेमात कुठेही माझा डमी वापरण्यात आलेला नाहीय. सगळी ऍक्शन दृष्ये मी स्वतःच केली आहेत. त्यासाठी आम्ही 6 महिने आधीपासून रिहर्सल करत होतो. म्हणजे गाण्याच्या स्टेप्ससाठी जशा रिहर्सल केल्या जातात, तशाच ऍक्शनदृष्यांसाठीही ‘बागी-2’मध्ये रिहर्सल केल्या गेल्या. तशाच रिहर्सल मी केल्या आहेत. त्यामुळे हाणामारीची ही दृष्ये परफेक्ट झाली आहेत.

आता मराठी चित्रपटांमध्ये ऍक्शन जॉनर वाढवण्याची आपली महत्त्वाकांक्षा असल्याचं संदीप सांगतो. मराठी सिनेमातील ऍक्शन जॉनरमध्ये माझं नाव झालं पाहिजे अशी इच्छा आहे. ‘रॉकी’ सिनेमानंतर सध्या मी दोन चित्रपटांवर काम करतोय. हे दोन्ही चित्रपट मोठय़ा बजेटचे आहेत आणि ते पूर्णपणे ऍक्शनपॅक्ड आहेत. यातला एक सिनेमा मेमध्ये सुरू होईल, तर दुसरा सप्टेंबरमध्ये सुरू होतोय, असंही तो पुढे स्पष्ट करतो.

पूर्ण स्वातंत्र्य मिळालं

‘रॉकी’ साकारणं कठीण झालं नाही, कारण दिग्दर्शक अदनान याने मला तो साकारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. तरीही हा माझा पहिलाच सिनेमा असल्याने मला जास्त अनुभव नव्हता. त्यात ‘बागी-2’सारख्या ऍक्शनपॅक्ड हिंदी सिनेमाला सहाय्यक दिग्दर्शन केल्यामुळे अदनान खूप अनुभवी होता. त्यामुळे तो काय सांगतोय ते ऐकून मी माझी भूमिका करत होतो. इतर सहकलाकारांचीही याबाबत खूप मदत झाली, असेही संदीप पुढे सांगतो.

आपली प्रतिक्रिया द्या