
रिटेल व्यापाऱ्यांसाठी लढा देणाऱया इंडियन सेलर्स कलेक्टीव्हने आज देशभरात ठिकठिकाणी बहुराष्ट्रीय ई-कॉमर्स ब्रॅण्डविरोधात हिंदुस्थान छोडो मोर्चाच्या रूपाने निदर्शने केली. यावेळी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ब्रॅण्डच्या प्रतिकात्मक प्रतिकृतींची होळी करण्यात आली. तसेच नागरिकांनी ई-कॉमर्स कंपन्यांच्या ब्रॅण्डवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंचा वापर करत छोटय़ा व्यापाऱ्यांना साथ देण्याचे आवाहन केले आहे.
बहुराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपन्या अनेक स्थानिक ब्रॅण्डची नक्कल करून स्वतःच्या ब्रॅण्डच्या नावाखाली अतिशय कमी किमतीत आपल्या वस्तू विकत आहेत. या वस्तू हातोहात विकल्या जाण्यासाठी या कंपन्या इंटरनेटवर वस्तू शोधमोहिमेत त्यांचेच ब्रॅण्ड झळकवत असल्याने स्थानिक ब्रॅण्डला संधी देत नाहीत. त्यामुळे या कंपन्यांच्या मंचावर आपल्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या वस्तू विकल्या जात नसल्याचे स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय सहआयोजक डॉ. अश्विनी महाजन यांनी स्पष्ट केले. ऑप्रियो रिटेलसारखे प्रचंड सवलत देत ते स्थानिक रिटेलर्सचा व्यापार मोडीत काढत चालले आहेत. अॅमेझॉन बेसिक्स, सिम्बॉल आणि सोलिमोसारख्या ब्रॅण्डच्या माध्यमातून त्यांनी देशातील कायदे पायदळी तुडवत संपूर्ण व्यापार आपल्याकडे खेचला आहे. इंडियन सेलर्स कलेक्टीव्हचे राष्ट्रीय समन्वयक अभय राज मिश्रा म्हणाले की, या कंपन्यांच्या व्यापार पद्धती बदलण्यासाठी आम्ही करत असलेली मागणी सरकारच्या पातळीवर कोणीही ऐकत नाही.


























































