उरणमध्ये ओव्हरलोड व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतूक पोलिसांचे अभय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

उरण तालुक्यात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भरावाची कामे सुरू असून हा भराव वाहून नेणारे डंपर अनेक ठिकाणी नियमबाह्य आणि ओव्हरलोड वाहतूक करताना दिसत आहेत. आपल्या जास्त फेऱ्या व्हाव्यात यासाठी हे डंपर चालक अवजड वाहनांना बंदी असलेल्या मार्गावरूनही बिनधास्तपणे वाहतूक करताना दिसत आहेत.

भेंडखळ गावाजवळ रिलायन्स सेझच्या जागेत सध्या भराव सुरू असून यासाठी आणण्यात येणारे डंपर अवजड वाहतुकीला बंदी असलेल्या नवघर रेल्वे उड्डाण पुलावरून बिनधास्तपणे आणले जात आहेत. हे डंपर ओव्हर लोड असल्याने अनेक ठिकाणी डंपरमधले दगड, माती रस्त्यावर पडून अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. वास्तविक पहाता हे भरावाच्या डंपरवर ताडपत्रीचे आच्छादन असणे गरजेचे असते मात्र कुठल्याही डंपरवर अशा प्रकारचे आच्छादन नसते. मंगळवारी अशाच प्रकारे नवघर उड्डाण पुलाजवळ भराव वाहून नेणाऱ्या डंपरमधून मोठाले दगड रस्त्यावर पडले. यावेळी पाठीमागून येणाऱ्या मोटार सायकलस्वार थोडक्यात बचावला. अशा या नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या डंपरकडे वाहतूक पोलिस जाणून बूजून दुर्लक्ष करत असून एखादा अपघात झाल्यावर कारवाई करणार का, असा सवाल नागरीकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.