
‘बेस्ट’च्या दादर येथील किंग्सवे विद्युत स्टेशनमध्ये रात्री 8 वाजताच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला. दादर, वडाळा आणि पारसी कॉलनी परिसराला याचा फटका बसला. तर गिरगाव चौपाटी येथील हायव्होल्टेज ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने गिरगाव आणि गावदेवी भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला. दादरमध्ये किंग्सवे विद्युत पुरवठा स्टेशनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे परिसरातील वीज पुरवठय़ावर परिणाम झाला. याची माहिती मिळताच ‘बेस्ट’ प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास किमान चार तासांचा वेळ लागेल, अशी माहिती ‘बेस्ट’च्या विद्युत विभागाकडून देण्यात आली. तर गिरगाव परिसरात ट्रान्सफॉर्मरला आग लागून झालेला तांत्रिक बिघाड एक तासाच्या प्रयत्नांनंतर दुरुस्त करण्यात आला.


























































