
वर्षानुवर्षे धोकादायक संक्रमण शिबिरात राहणाऱया कन्नमवार नगरातील 143 गाळेधारकांना शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या प्रयत्नाने हक्काची सुसज्ज घरे मिळाली आहेत. त्यानुसार संबंधितांना चावी वाटप करण्यात आले. शिवसेनेने दिलेले वचन पूर्ण केल्याने रहिवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील कन्नमवार नगरात म्हाडाच्या अनेक जुन्या इमारती असून त्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणारे अनेक रहिवासी गेल्या 40 वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहत होते. त्यांना हक्काचे घर मिळत नव्हते. मात्र 2014 मध्ये आमदार होताच सुनील राऊत यांनी संक्रमण शिबिरातील रहिवाशांना हक्काचे घर मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
त्यानुसार आतापर्यंत 1400 पेक्षा जास्त रहिवाशांना टप्प्याटप्प्याने सुसज्ज टॉवरमध्ये हक्काची घरे मिळवून दिली आहेत. तसेच इमारत क्र. 181 अ, ब, इमारत क्र. 183 अ, चाळ क्र. 17, 18 मधील 143 गाळेधारकांनाही गुरुवारी त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या सुनील राऊत यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. तसेच संक्रमण शिबिरातील शेवटच्या कुटुंबाला हक्काचे सुसज्ज घर मिळवून देत नाही तोपर्यंत माझा लढा थांबणार नाही अशी ग्वाही यावेळी राऊत यांनी दिली. यावेळी रहिवाशांनी आमदार सुनील राऊत आणि शिवसेनेचे आभार मानले. याप्रसंगी कन्नमवार नगरचे स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत, शाखाप्रमुख अभय राणे आदी उपस्थित होते.





























































