कुंभारवाड्यात जणू मृत्यू घिरट्या घालतोय! लक्ष्मी बिल्डिंगचा पुनर्विकास बोंबलला

80
transit-camps-laxmi-apartme

सामना प्रतिनिधी । मुंबई

डोंगरी दुर्घटनेनंतर मरणाने कुंभारवाड्यात घिरट्या घालण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात दाटीवाटीने उभ्या असलेल्या जीर्ण इमारती एकावर एक कोसळण्याच्या स्थितीत आहेत. शंभरी ओलांडलेली लक्ष्मी बिल्डिंग ही याच पंक्तीतील. बिल्डरने पाठ फिरवल्यामुळे तिचा ढाचा खिळखिळा झाला आहे. बिल्डर आमच्या टाळूवरचे लोणी खाण्याची वाट बघतोय, अशी संतप्त भावना येथील 150 भाडेकरू व्यक्त करत आहेत.

दुसरा कुंभारवाडा लेनमध्ये असलेल्या पाच माळ्याच्या लक्ष्मी बिल्डिंगमध्ये 10 दुकान गाळे आणि 100 भाडेकरू आहेत. पुनर्विकासासाठी सात वर्षांपूर्वी भाडेकरू आणि जागामालकाने संघवी बिल्डरला संमती दिली. सुरुवातीला भाडेकरूंना चांगल्या घराचे आश्वासन देऊन झुलवत ठेवले. नंतर मात्र बक्कळ आर्थिक लाभ होणार नसल्याचे लक्षात घेऊन बिल्डरने हात वर केले. पुनर्विकास झेपत नसल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले, तर आम्ही म्हाडाकडे जाऊ, असे येथील रहिवाशांनी सांगितले. बिल्डिंगच्या तळमजल्याला मेटलची दुकाने आहेत. त्यांचे काम सतत सुरू राहत असल्यामुळे बिल्डिंग आणखी कमकुवत बनत चालली आहे. मोलमजुरी करणारे हे रहिवासी आपापल्या ऐपतीने पैसे काढून दुरुस्ती करतात. पावसाळ्यात तळमजल्यावर गटाराचे गुडघाभर पाणी साचते. शौचालयाची टाकी फुटलीय, छपराची चाळण झालीय, जिन्याच्या लाद्या उखडल्यात, लोखंडी खांब गंजून गेलेत अशी पूर्ण वाताहात बिल्डिंगची झाली आहे. बिल्डिंगचा पाया उंदीर-घुशींनी ठिसूळ केला आहे. त्यामुळे बिल्डिंग कधीही कोसळू शकते ही भीती रहिवाशांना हैराण करत आहे.

आमचं हातावरचं पोट आहे. बिल्डिंगला 100 वर्षे झालीत. ती कधीही कोसळेल म्हणून आम्ही संघवी बिल्डरला संमती दिली, पण काय झालं? तो सात वर्षांत एकदाही फिरकला नाही. आम्ही अक्षरश: गोठ्यात राहतोय. रात्रभर झोप लागत नाही. रोज देवाचे नाव घेऊन दिवस ढकलतोय.
– लता आंधळे, रहिवासी, लक्ष्मी बिल्डिंग

बिल्डरने आमचा विश्वासघात केलाय. सात वर्षांपूर्वी संमतीपत्र घेतले. आता एफएसआयचा बहाणा सांगून चालढकल करतोय. सात वर्षांत तो कधीच फिरकला नाही. केवळ सणासुदीला मिठाई पाठवतो. आमचं छप्पर धड नाही मग मिठाई कशी गोड लागेल? बिल्डर फक्त भाडे वाढवतेय. भाडे वाढवून घ्या, पण जगणं तरी सुरक्षित करा.
– विनायक मेहेर, रहिवासी

तळमजल्याला मेटलची दुकाने आहेत. ते आमच्या दु:खात आणखीन भर टाकताहेत. त्यांचा आम्हाला मोठा त्रास आहे. बहुतांशजण भाड्याने दुकान घेऊन धंदा करताहेत. त्यांना आमच्या सुरक्षेचे काहीएक पडलेले नाही. तुम्ही मरा आणि आम्ही धंदा करतो, अशीच त्यांची भूमिका आहे.
– दीपक आंधळे, रहिवासी

लक्ष्मी बिल्डिंगच्या पुनर्विकासासाठी भाडेकरूंनी बिल्डरला संमती दिली असेल तर म्हाडाचा काहीच संबंध येत नाही. जर बिल्डर चालढकल करत असेल तर भाडेकरूंनी त्या बिल्डरशी केलेले ‘डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट’ रद्द केले पाहिजे.
– सूर्यकांत देशमुख, उपअभियंता, म्हाडा-सी वॉर्ड

लाकडी टेकूंवर तग धरून आहे ‘रंभा भवन’

कुंभारवाडा तिसऱया लेनमधील ‘रंभा भवन’ बिल्डिंग पूर्णपणे टेकूवर तग धरून आहे. 26 भाडेकरूंपैकी केवळ सहा भाडेकरू या इमारतीत राहतात. यात 85 वर्षीय निरुबेन सिद्धपुरा या वृद्धेचा समावेश आहे. दोन मुलींचे लग्न झाल्यानंतर निरुबेन एकटय़ाच घरात राहतात. याच बिल्डिंगमध्ये जन्म झालाय. त्यामुळे दुसरीकडे जाऊन मरण्यापेक्षा इथे मेलेले बरे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया निरुबेन देतात. बिल्डिंगचा पुनर्विकास सरकारी धोरणानुसार शेजारी पुरेसी जागा नसल्यामुळे लटकला आहे. बिल्डर भाडय़ापोटी केवळ आठ हजार रुपये देतोय, पण एवढय़ा पैशात भाडय़ाने घर कुठे मिळणार? म्हणून धोका असूनही येथेच राहतोय, असे 68 वर्षीय किशोरभाई सिद्धपुरा यांनी सांगितले.

आवाहन

मुंबईत शेकडो, हजारो इमारती धोकादायक म्हणून सरकारदरबारी नोंदलेल्या आहेत, पण त्यापलीकडेही ही यादी असू शकते. दुसरा कोणताच पर्याय नसल्याने अशा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये कितीतरी कुटुंबे डोक्यावर भीतीची टांगती तलवार घेऊनच राहत आहेत. खोली रिकामी केली तर ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये खितपत पडावे लागेल ही भीती असते आणि या भीतीपोटीच मृत्यूची भीती आपलीशी केली जाते. वाचकहो, तुमच्या अशा इमारतींची किंवा तुमच्या शेजारची इमारत अशी भीतीच्या टेकूवर उभी असेल तर आम्हाला माहिती द्या! ई-मेल: [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या