‘हा’ आहे मिठ्या मारून पैसा कमवणारा माणूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक प्रकारच्या थेरपींबद्दल आपण आतापर्यंत ऐकलं आहे. स्पीच थेरपी, डान्स थेरपी, फिजीयो थेरपी मसाज थेरपी. मात्र इंग्लंडमधील एक तरुण चक्क मिठ्या मारण्याची थेरपी देऊन तासाला हजारो रुपये कमवत आहे. ट्रेवोर हुटन असे त्या तरुणाचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे.

ट्रेवोर याची ही थेरपी परदेशात ‘कडल थेरपी’ म्हणून प्रसिद्ध आहे. यात तो ज्या व्यक्तींना भीती वाटते, एकटे वाटते, कुणाशी बोलण्याची गरज आहे, थोड्या वेळासाठी कुणाच्या सोबतीची गरज आहे अशा व्यक्तींना ही कडल थेरपी देतो. यात त्या व्यक्तींना मिठी मारणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांचं ऐकूण घेणं, त्यांना समजावणं अशा गोष्टी येतात. त्यासाठी तो तासाला तब्बल सात हजार रुपये चार्ज करतो. ट्रेवोनची ही कडल थेरपी ही इंग्लंडच्या ब्रिस्टोल शहरात प्रसिद्ध होत आहे.

”मी काही महिन्यांपूर्वी हा माझा व्यवसाय सुरू केला. अनेक जण माझ्या कामाचा चुकीचा अर्थ काढतात. त्यांना वाटतं मी लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवतो. पण तसं नाही. अनेक लोकांना वेगवेगळे त्रास असतात. त्यांना फक्त जवळ घेऊन त्यांची काळजी घेऊन त्यांच्याशी प्रेमाने बोलायची गरज असते. लोकांना जे हवं ते द्यायचं हे माझं काम आहे. कधी कधी काही जण अनोळखी व्यक्तीला मिठी मारायला लाजतात. पण थोडा वेळ गप्पा झाल्यावर ते अगदी नॉर्मल होतात”, असे ट्रेवॉर सांगतो.