बनावट पासपेर्ट बनवणाऱ्या दोन एजंटना अटक, 14 लाख घेऊन पाठवणार होते लंडनला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील शेतकऱ्याला बनावट पासपोर्टद्वारे लंडनला पाठवणाऱ्या दोन एजंटना सहार पोलिसांनी अटक केली. जितेंद्रकुमार रमेशभाई तांडेल आणि विवेककुमार नारायणभाई जाधव अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांनी पोर्तुगाल हाय कमिशनला बनावट कागदपत्रे सादर केली होती.

जिग्नेशभाई पटेल हे शेतकरी असून त्यांना कायमस्वरूपी लंडनला राहण्यास जायचे होते. त्यासाठी त्यांनी मोहन पटेल यांना संपर्क साधला. मोहन यांनी जिग्नेशची जितेंद्रकुमार आणि विवेकुमारशी ओळख करून दिली. ओळखीनंतर लंडनला जाण्यासाठी 14 लाख रुपये खर्च येईल, असे जिग्नेशला सांगण्यात आले होते. कायमस्वरूपी लंडनला जायचे असल्याने जिग्नेशने होकार दिला. 30 सप्टेंबरला जिग्नेश हे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने लंडनला गेले. लंडन विमानतळावर गेल्यावर जिग्नेशच्या पासपोर्टची तपासणी केली. तेव्हा तेथील विमानतळ अधिकाऱयांना  संशय आला. त्यानी जिग्नेशला पुन्हा मुंबईला पाठवून देत याची माहिती विमानतळ प्राधिकरणाला दिली.

लंडनहून मुंबई विमानतळावर येताच जिग्नेशला विमानतळ अधिकाऱ्याने ताब्यात घेऊन याची माहिती सहार पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत जितेंद्रकुमार आणि विवेककुमारचे नाव समोर आले. त्या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक सुरत आणि गुजरातला गेले. तेथून त्या दोघांना अटक करून मुंबईत आणले. जिग्नेशला जितेंद्रकुमार आणि विवेककुमार या दोघांनी बनावट पासपोर्ट तयार करून दिला होता. लंडनला जाण्यासाठी त्याने एका महिलेशी विवाह झाल्याचे खोटे विवाह प्रमाणपत्र पोर्तुगाल हायकमिशनला सादर केले होते.