
सामना प्रतिनिधी । अलिबाग
डायलिसिस आजारावर उपचार करण्यासाठी शक्कल लढवून पोलीस असल्याची बतावणी करून फसविणारा आरोपी व त्याचा साथीदार असे दोघांना पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. अमित जगन्नाथ कांबळे (26) असे नकली पोलीस बतावणी करणारा व त्याचा साथीदार विष्णु रामबहाद्दूर गिरी (27) असे अटक केलेल्या इसमाची नावे आहेत. या दोघांना काल अलिबाग न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अमित कांबळेवर राज्यात विविध पोलीस ठाण्यात 19 गुन्हे नोंद आहेत.
29 नोव्हेबर 2018 रोजी बंगलोर येथे प्रेत घेऊन जायचे आहे. असे शववाहिनी चालक किशोर म्हात्रे यांना कंट्रोल रूममधून पीएसआय पाटील बोलत असल्याची बतावणी आरोपी अमित कांबळे याने फोनवरून केली होती. किशोर यांना अमित यांनी सांगितले की, माझ्या खात्यात पैसे जमा झाले असून तुमच्या खात्यात पैसे पाठविण्यासाठी विलंब होणार आहे. त्यामुळे पोलीस डिझेल कार्डासाठी आपल्या खात्यात दहा हजार रुपये पाठविण्यास शववाहिनी चालक किशोर यास सांगितले. त्यानुसार किशोर म्हात्रे यांनी अमित यांच्या खात्यात दहा हजार रुपये भरले. मात्र नंतर आपण फसलो गेलो असल्याचे किशोर म्हात्रे यांना समजल्यानंतर त्याने अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलीस असल्याची बतावणी करून फसवले गेल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होता. यासाठी जिल्हा अधीक्षक अनिल पारस्कर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांना तपासाचे आदेश दिले. त्यानंतर शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल वलसंग व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक नेमले. त्यानुसार सायबर शाखेच्या मदतीने स्थानिक गुन्हे विभागाने तपास करून अमित कांबळे व विष्णू गिरी यांना 26 डिसेंबर रोजी पुणे येथून अटक करण्यात आली. चौकशीअंती दोघांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोघा आरोपीची चौकशी केली असता अमित कांबळे यांनी गुन्हा का केला याचे सत्य समोर आल्याने पोलीसही चक्रावले आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख, पोलीस उपनिरीक्षक अमोल वलसंग व पोलीस पथकाने केली आहे.
शक्कलेवर पाणी पडले
अमित कांबळे याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. त्याला तीन दिवसांनी रुग्णालयात जाऊन डायलिसिस करावी लागते. मात्र अमित याची आर्थिक स्थिती चांगली नसून मामा सोडला तर त्याचे कोणी नातेवाईक नाहीत. त्यामुळे डायलिसिस करण्याचा खर्च त्याला परवडणारा नव्हता. त्यासाठी तो लोकांची फसवणूक करीत होता. राज्यात अमित कांबळेवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 19 गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलिसांनी अटक केल्यानंतर शासनामार्फत डायलिसिस खर्च होईल, असेही अमित याला वाटत होते. मात्र 19 ही गुन्ह्यात न्यायालयाने त्याला जामीनावर सोडले असल्याने त्याच्या शक्कलवर पाणी पडत आहे.

























































