वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

मित्राच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार घेऊन जाणाऱ्या दोघांना तलवारीसह सदर बाजार पोलिसांनी नवीन जालन्यातील खांडसरी परिसरात जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून तलवार जप्त करण्यात आली.

सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या सूचनेवरून जवाहर बाग पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी स्वप्निल रमेश साठेवाड आणि योगेश पठाडे हे मंगळवारी रात्री उशिरा खांडसरी परिसरात मोटारसायकलवरून पेट्रोलिंग करीत होते. तेवढ्यात त्यांना समोरून एक जण तलवार घेऊन घाईगडबडीने जात असताना दिसला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले. राहुल धर्मा सुतार (२५, रा. हनुमानघाट) यास तलवारीबाबत विचारण्यात आले असता त्याने ही तलवार मित्राचा वाढदिवस असल्याने केक कापण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. ही तलवार संतोष शंकर जाधव (रा. हनुमानघाट) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल साठेवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल धर्मा सुतार व संतोष शंकर जाधव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.