
सामना प्रतिनिधी । लोणार (बुलढाणा)
तालुक्यातील पिंपळखुटा येथे सोमवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून पूर्ण घरही जळाले आहे.
पिंपळखुटा येथील सत्यभामा प्रकाश घनवट व त्यांची मुलगी शेतात मजुरीसाठी गेल्या होत्या. त्यांच्या राहत्या घरी दुपारी अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात ज्ञानेश्वर माधव रसाळ (7) व काजल माधव रसाळ (5) या दोघांचा जळून मृत्यू झाला. तसेच संपूर्ण घर जळाले आहे. लोणार येथील अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. गावातील सर्व नागरिकांनी आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. महसूल विभागाच्या वतीने जळालेल्या घराचा पंचनामा सुरू होता. मात्र, नेमकी किती वित्तहानी झाली याची माहिती मिळालेली नाही. सिलिंडर स्फोट कशामुळे झाला, याबाबतची माहितीही मिळालेली नाही.
या स्फोटात घरातील सर्व साहित्य आगीत खाक झाले आहे. या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे पिपळखुटा या गावावर शोककळा पसरली आहे. घटनेस्थळी लोणार पोलीस ठाण्याचे पीएसआय अजहर शेख व पथकाने भेट दिली. तसेच गटविकास विकास अधिकारी सुरेश कांबळे, रविंद्र मापारी, एस.पी. ठोके, शिवछत्र नंदकिशोर मापारी यांनी दुपारी भेट दिली. सायंकाळी खासदार प्रतापराव जाधव यांनीसुद्धा घटनास्थळी भेट दिली आहे.





























































