
अरुणाचल प्रदेशमधील 14,500 फूट उंचीवरच्या कामेंग प्रांतातील हिमस्खलनात बेपत्ता झालेले सातही जवान शहीद झाले. मागील दोन दिवसांपासून त्यांचा शोध घेतला जात होता. अखेर मंगळवारी त्यांचे मृतदेह सापडले. पर्वतरांगातील जोरदार बर्फवृष्टीमुळे या जवानांना प्राण गमवावा लागला. लष्कराने या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. खराब वातावरणामुळे बचाव पथकाला बेपत्ता जवानांना वाचवता आले नाही.
कामेंग प्रांतातील पर्वतरांगांत रविवारी लष्कराच्या सात जवानांची तुकडी गस्त घालत होती. यादरम्यान हिमस्खलनाची दुर्घटना घडली. त्यात पेट्रोलिंग टीममधील सर्व जवान अडकले. त्यांना वेळीच सुखरूप बाहेर काढण्यासाठी लष्कराने तज्ञांचे एक पथक तातडीने विमानाने घटनास्थळी रवाना केले. या पथकाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले होते, मात्र अनेक तासांच्या शोधमोहिमेत सात जवानांपैकी कुणाचाही थांगपत्ता लागला नाही. अखेर मंगळवारी सातही जवान शहीद झाल्याचे निदर्शनास आले. लष्कराच्या पथकाने हिमस्खलनाच्या ठिकाणाहून जवानांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले. ‘अरुणाचल प्रदेशच्या कामेंग प्रांतातील हिमस्खलनात प्राण गमावलेल्या लष्कराच्या जवानांच्या मृत्यूने दुःख झाले आहे. या शूर जवानांनी देशसेवेत आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्या शौर्याला आणि सेवेला मी सलाम करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना,’ असे ट्विट संरक्षणमंत्र्यांनी केले.


























































