विणकरांच्या आयुष्याची वीण घट्ट करण्यासाठी दोघा मुंबईकरांनी लॉक डॉऊनमध्ये उभारला ब्रॅण्ड

विविधतेने नटलेल्या हिंदुस्थानात एकेकाळी हातमाग हा प्रमुख उद्योग होता. काळाच्या ओघात ही विणकाम कला मागे पडत आहे. मोजक्या विणकरांनी ही कला जिवंत ठेवली आहे. लॉकडाऊनचा फटका या विणकरांना बसला. बाजारपेठा बंद असल्याने खरेदीदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. काम बंद झाले. विणकरांच्या आयुष्याची वीण सैल झाली. ती वीण घट्ट करण्यासाठी आपला हातभार लागावा आणि विणकरांच्या हाताला काम मिळावे म्हणून मुंबईतील संदीप आचरेकर आणि मनीषा लिंगायत सरसावले. दोघांनी लॉक डाऊनच्या काळात आरसा हॅण्डलूमहा ब्रॅण्ड सुरू केला. अल्पावधीतच या ब्रॅण्डने स्वतःची ओळख निर्माण केली आहे

संदीप आचरेकर आणि मनीषा लिंगायत या दोघांनी आरसा हॅण्डलूम ब्रॅण्ड जून 2020 मध्ये सुरू केला. लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या विणकरांना मदत करायचे ठरवले. त्यांनी विणकरांकडे उपलब्ध असलेला साठा खरेदी केला. त्यांची विक्री करून योग्य तो मोबदला विणकरांना दिला. आज कोलकाता, पैठण, येवले, कांचीपुरम येथील 30 ते 35 कारागीर आरसा हॅण्डलूमशी जोडले गेले आहेत.

 अनेक प्रकारच्या हातमागावर बनवलेल्या साडय़ा, हातमाग कापडापासून बनवलेले कपडे आणि हॅण्डबॅग अशी अनेक उत्पादने आरसा हॅण्डलूमअंतर्गत ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती मनीषा लिंगायत यांनी दिली. आरसा बीस्पोक हे पुरुषांसाठी खास कलेक्शन आहे. प्रसिद्ध कथ्थक नृत्यगुरू मयूर वैद्य यांनी या कलेक्शनचे डिझाईन केले आहे. या उत्पादनांच्या खरेदीसाठी आरसा हॅण्डलूमच्या इन्स्टाग्राम पेजवर भेट देता येईल.

प्रत्येक घरात हातमाग
आम्ही हातमाग कौशल्याला लावण्य आणि ग्लॅमर देण्याचे ठरवले आहे. नव्या पिढीने हातमाग उत्पादनांकडे वळावे आणि प्रत्येक घरात हातमागाचा अधिक वापर व्हावा यासाठी ही कला आरसा हॅण्डलूमद्वारे  वेगवेगळ्या प्रकारे सादर केली जाणार आहे. मुंबईत हातमागाद्वारे थेट साडी बनवण्याच्या कार्यशाळा घेण्याची योजना आहे. प्रत्येक घरात हातमाग हे आमचे व्हिजन आहे.
-संदीप आचरेकर