गोदावरीत भाविकांची बोट उलटली, विदर्भातील दोन महिलांचा मृत्यू; 12 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अधिक मासनिमित्त माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची बोट उलटून दोन महिलांचा बुडून मृत्यू झाला, तर 12 महिला जखमी झाल्या. मृत दोन्ही महिला विदर्भातील आहेत. जखमींपैकी एका महिलेला तातडीने उपचार मिळाल्यामुळे तिचा जीव बचावला. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त भाविक बसवण्यात आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे परतूरचे तहसीलदार दामोधर जाधव यांनी सांगितले.

विदर्भाच्या बुलढाणा जिल्हय़ातील दहा महिलाही बुधवारी सकाळी दर्शनासाठी आल्या होत्या. या महिलांनी आपले खासगी वाहन पार्किंगमध्ये लावले आणि गोदास्नान करण्यासाठी बोटीने पलीकडच्या तीरावर गेल्या. स्नान करून त्या पुरुषोत्तमपुरीकडे बोटीने परत निघाल्या. परतीच्या प्रवासात बोटचालकाने बोटीत क्षमतेपेक्षा जास्त भाविक बसवले होते. बोट थोडी पुढे येताच एका बाजूला कलंडली आणि पात्रात उलटली.

बोट उलटल्याचे पाहताच स्थानिक तरुणांनी तत्काळ गोदापात्रात उडय़ा मारल्या आणि बुडणाऱ्या भाविकांना बाहेर काढले. बोट उलटल्यानंतर घटनास्थळावरूनच बोटचालक उद्धव गायकवाड हा थेट आष्टी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. या दुर्घटनेप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.