अतिवृष्टीमुळे पेण येथे भोगावती नदीत बुडून दोन युवक बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

भोगावती नदीमध्ये मच्छिमारी साठी गेलेल्या दोन युवक नदीत बुडून बेपत्ता झाल्याची घटना पेण येथे घडली आहे.

पेण कोळीवाड्यातील अनिकेत प्रमोद वासकर (२४) तर धावटे आदीवाशी वाडी येथील सागर वाघमारे (२३) हे दोन युवक मासेमारी करीता भोगावती नदीवर गेले होते. दुपारी ३ ते ६ दरम्यान पेण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला अचानक पुर आला व जोरात आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामध्ये दोन्ही युवक वाहुन गेले. त्याना शोधण्याकरीता तहसीलदार अजय पाटणे यांनी शोध मोहीम हाती घेतली आहे परंतु सायंकाळी उशिरा पर्यंत दोघांचाही शोध लागला नाही. पेण कोळीवाड्यातील नागरिकांनीही शोध सुरू केला आहे.

दरम्यान, या पुरात पेण नगरपालिकेचे पाणी पुरवठा करणाऱ्या पंपींग स्टेशनची काही मशिन वाहुन गेली आहे. पेण शहरातील एसटी स्टँड, म्हाडा कॉलनी, कोर्ट परीसर, उत्कर्ष नगर सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांना समस्यांना सामोरी जावे लागले आहे. त्याच प्रमाणे मुंबई गोवा महामार्गावर रामवाडी येथे महामार्गाचे काम सुरु असल्याने भरावामुळे पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.