
कोरोनाच्या संकटाला मागे टाकून बॅडमिंटन पुन्हा ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करीत होते. पण या प्रयत्नांना काही यश मिळाले नाही. 3 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत थॉमस व उबेर कप ही जागतिक स्तरावरील मानाची बॅडमिंटन स्पर्धा डेन्मार्क येथे आयोजित करण्यात येणार होती. बॅडमिंटन मोसमालाही या स्पर्धेपासून सुरुवात होणार होती. पण थॉयलंड, ऑस्ट्रेलिया, तैवान, इंडोनेशिया व दक्षिण कोरिया या देशांनी कोरोनामुळे या स्पर्धेमधून माघार घेतली.
त्यामुळे जागतिक बॅडमिंटन संघटनेकडून मंगळवारी ही स्पर्धा स्थगित करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यावेळी आयोजक डेन्मार्क बॅडमिंटन यांच्यासोबतही त्यांनी चर्चा केली. त्यामुळे बॅडमिंटनच्या पुनरागमनाच्या आशांना सुरुंग लागला आहे. जागतिक बॅडमिंटन संघटनेकडून पुढे सांगण्यात आले की, थॉमस व उबेर कपच्या आयोजनासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात येणार आहेत. नव्या तारखांबाबत विचार सुरू आहे. पण आता ही स्पर्धा 2021 सालामध्येच पार पडणार आहे. त्याआधी ही स्पर्धा खेळवण्यात येऊ शकत नाही. तसेच डेन्मार्क मास्टर्स ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डेन्मार्क ओपन स्पर्धा नियोजित वेळेप्रमाणे अर्थातच 13 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येईल.
सायनाने व्यक्त केली होती चिंता
हिंदुस्थानची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना हिने कोरोनाच्या काळात स्पर्धा आयोजन घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल करीत चिंता व्यक्त केली होती. तसेच चीन व जपान या बलाढय़ देशांनीही या स्पर्धेमधून माघार घेतली नसली तरी त्यांच्याही सहभागाबाबत प्रश्नचिन्ह कायम होते. कारण जपान माघार घेण्याच्या तयारीत होता, तर चीन त्यांच्या सरकारकडून परवानगी मिळवण्याच्या प्रतीक्षेत होता.
सिंगापूर, हाँगकाँगचा नकार
कोरोनामुळे डेन्मार्कमध्ये थॉमस व उबेर कप न खेळवता इतरत्र ही स्पर्धा खेळवता येऊ शकते का, याबाबत जागतिक बॅडमिंटन संघटना प्रयत्न करीत होते. यासाठी सिंगापूर व हाँगकाँग या दोन्ही देशांना विचारण्यातही आले होते. पण दोन्ही देशांनी स्पर्धा आयोजनासाठी नकार सांगितला.



























































