केंद्राकडून राज्याला लसींचा साठा मिळाला नसल्याने लसीकरण थांबवण्याची वेळ आली – उदय सामंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रसरकारकडून राज्यसरकारला कोरोनावरील लसीचा पुरवठा न झाल्यानेच लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्रसरकारकडून लस उपलब्ध न झाल्यास उद्यापासूनच जिल्ह्यातील लसीकरण थांबवावे लागेल, अशी खंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

केंद्रसरकारकडून ज्या प्रमाणात महाराष्ट्राला लस मिळायला पाहिजे त्या प्रमाणात ती मिळत नाही. महाराष्ट्राने लसीचे डोस फुकट घालवल्याचा आरोप होत असला तरी महाराष्ट्रात लसीचे फुकट घालवण्याचे प्रमाण 3.2 टक्के आहे. त्यामानाने तेलंगणा, उत्तरप्रदेश कर्नाटकात लस फुकट घालवण्याचे प्रमाण अधिक असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री अ‍ॅड.अनिल परब मुंबईतून ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़.मोहितकुमार गर्ग, जि़.प़.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़.बबीता कमलापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़.संघमित्रा फुले, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत उपस्थित होते़.

या बैठकीत आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत माहिती दिली. जिल्ह्यात सध्या 2628 बेड उपलब्ध आहेत. त्याव्यतिरिक्त महिला रुग्णालयात 125, जिल्हा रुग्णालयात 50 आणि सावर्डे येथे 100 बेड उपलब्ध करुन देण्याचा निर्णय बैठकीत झाला. जिल्ह्यामध्ये रेमेडेसीवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सध्या साडेसातशे इंजेक्शन उपलब्ध असून नवीन साठाही मागवण्यात आला आहे, असे सामंत यांनी सांगितले.