
तरुणांना ज्यांनी झुरळ म्हटलं त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, खुर्चीवर बसलात म्हणून डोक्यात माज गेल्यासारखं वागू नये. कारण आता एका एका झुरळानेच हुकूमशहाला झुकवले आहे. देशातील युवाशक्ती एकत्र आली तर काय होऊ शकते हे दाखवून दिले आहे. त्यामुळे या अभिजित दीपके, सोनम वांगचुक यांच्यासह त्यांना पाठिंबा देणाऱया सर्वांना मी धन्यवाद देतो, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज म्हणाले.
‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी देशभरात पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्याने आज अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ येथे पत्रकार परिषद घेऊन देशातील आंदोलक तरुणांचे अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते. तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले आहे, असे ते म्हणाले.
खुर्चीवर बसला म्हणून डोक्यात माज गेल्यासारखं वागू नका. देशातली युवाशक्ती एकत्र आली तर काय करू शकते याची ही झलक आहे. या सर्वांना मी धन्यवाद देतो. यापुढे देशात कुणी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करेल त्याला तरुण चिरडून टाकेल.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
…नाहीतर आता अमित शहांकडे मोर्चा वळेल
या आंदोलनाच्या निमित्ताने भाजपचा बीभत्स चेहरा समोर आला आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज, अत्याचार कुणाच्या सांगण्यावरून केला? या प्रश्नांची उत्तरे आता अमित शहांनी दिली पाहिजेत. नाहीतर आता अमित शहांकडे मोर्चा वळेल, असा इशाराही त्यांनी दिला.
क्रांतीची ठिणगी विझलेली नाही
आपण कशीही मस्ती दाखवली तरी चालून घेतली जाते हा मस्तवाल सरकारचा भ्रम तरुणाईने भुईसपाट करून टाकला. म्हणून त्यांना धन्यवाद! मात्र क्रांतीची ठिणगी अजून विझलेली नाही. अजूनही क्रांतिकारक जन्माला येऊ शकतात हे तरुणाईने जगाला दाखवून दिले.
जनताच विष्णूचा अवतार! उद्धव ठाकरेंची ‘दणका’ मुलाखत; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा!




























































