जनतेचा बुलडोझर तुमच्या सरकारवरून फिरवणारच! पालघरमधून उद्धव ठाकरे यांची बुलंद गर्जना

2019 च्या निवडणुकीत आमची मोठी चूक झाली. मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून शिवसेनेने साथ दिली. पण जो यांना देईल साथ… त्यांचा होईल घात हेच यांचे स्लोगन.

स्वतःला विश्वगुरू म्हणवता, मग प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरेचं नाव घेतल्याशिवाय ते पूर्ण होत नाही काय? चीनसमोर शेपटय़ा घालता, पण उद्धव ठाकरेला संपवण्याची कारस्थानं करता… संपवूनच दाखवा.

मोदींनी देशात नोटबंदी केली… आता नाणेबंदीही करतील… पण महाराष्ट्रात मोदींचे नाणे चालणार नाही. फक्त ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि पवार साहेबांचेच नाणे चालेल!

>> राजेश पोवळे / सचिन जगताप

युती सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांनी वाढवण बंदराचा विषय संपवून टाकला होता. तो पुन्हा कुणी जिवंत केला? पुन्हा या निर्णयात हवा कुणी भरली? जनतेच्या विरोधाला किंमत न देता तुम्ही हा प्रकल्प राबवणार असाल तर माझे आव्हान आहे, तो राबवूनच दाखवा. जनतेचा बुलडोझर तुमच्या सरकारवरून आम्ही फिरवणारच, अशी बुलंद गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पालघरमध्ये केली. जनसागराच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाची जनसुनावणी घेताना ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’ असा नारा दिला तेव्हा ‘शिवसेना झिंदाबाद..’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा गगनभेदी घोषणांनी बोईसरचे आंबटगोड मैदान दणाणून गेले. नकली शिवसेना असे बरळणाऱया शहा-मोदी जोडगोळीचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. नकली शिवसेना म्हणायला ती मोदींची बोगस डिग्री आहे काय? असे तडाखे लगावतानाच आमचा पक्ष तुमच्यासारखा भेकड, भाडखाऊ, भ्रष्ट पक्ष नाही. यापुढे महाराष्ट्रात मोदींचे नाही फक्त ठाकरे-पवारांचेच नाणे चालणार, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

पालघर लोकसभेच्या शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी बोईसरच्या पास्थळ येथील आंबटगोड मैदानावर उद्धव ठाकरे यांची झंझावाती सभा झाली. दुपारी रणरणत्या उन्हातही हे मैदान गर्दीने ओव्हरपॅक झाले होते. मैदानाभोवतीचे तिन्ही रस्ते शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाने ओसंडून वाहत होते. महाराष्ट्रावर अन्यायाचा वरवंटा फिरवणाऱया मोदी-शहा आणि गद्दारांवर या गर्दीच्या साक्षीनेच उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला.

उद्धव ठाकरे म्हणाले, 1995मध्ये मनोहर जोशी युतीचे मुख्यमंत्री असताना वाढवण बंदराची चर्चा सुरू झाली. या वेळी शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितले, पालघरमध्ये जा आणि लोकांशी बोल. मी इथे येऊन लोकांशी चर्चा केली तेव्हा माता, भगिनी, आबालवृद्ध साऱयांनीच काहीही करा, हवंतर आम्हाला गोळ्या घाला, पण हे वाढवण बंदर नको अशा तीक्र भावना व्यक्त केल्या होत्या. मी शिवसेनाप्रमुखांना हे सांगितल्यावर त्यांनी तत्काळ मनोहर जोशींना फोन केला आणि वाढवण बंदर रद्द करा, असे आदेश दिले. तेव्हा संपलेल्या या विषयात आणि या निर्णयात पुन्हा हवा का भरली आहे, हे बंदर कुणासाठी उभारताय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. वाढवण बंदर झाले तर कोणाच्या घशात जाईल, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला तेव्हा गर्दीतून आवाज आला… अदानीच्या… उद्धव ठाकरे म्हणाले, अदानी कोणाचा मित्र… तेव्हा गर्दीतून पुन्हा आवाज आला, मोदींचा… पुन्हा उद्धव ठाकरे यांनी सवाल केला, विकास कोणाचा होणार? गर्दीतून आवाज, अदानीचा… मग उद्धव ठाकरे म्हणाले, सांगा मच्छीमारांचे काय होणार? गर्दीतून एकच आवाज घुमला, विध्वंस… विध्वंस… विध्वंस! हाच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, म्हणूनच माय-बापहो, सावध रहा! या निवडणुकीत जर चुकलात तर तुमचा वाढवणविरोध मोडून काढण्यासाठी ते रणगाडे आणतील आणि वाढवण उभारतील. यासाठी  हीच ती वेळ आहे. त्यांना गाडायचे असेल तर आताच… लढवय्यी भारती कामडी लोकसभेत जाणार आणि वाढवणचा फडशा पाडणार हे माझे वचन आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

मिंधेंची दाढी चळाचळा कापते

बाळासाहेबांचे विचार… असे एकसारखे सांगत हे मिंधे माईकवरती कुंथताहेत ते बाळासाहेबांचे विचार नाहीत. अरे, शिवसेनेचा दरारा काय आहे… बाळासाहेबांचा एक फोन गेल्यावर दिल्लीतील लोक चळाचळा कापायचे… आता दिल्लीतला फोन आता की मिंधेंची दाढी कापते चळाचळा… हे शिवसेनेचे विचार. अरे, संपवून टाकलं तुम्हाला. तुम्हाला कळलंच नाही. तुमच्या बुडाखालची सतरंजी काढून घेतली. अरे तुम्ही स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाही, असे तडाखेही उद्धव ठाकरे यांनी मिंधेंना लगावले.

मोदी सरकार नाही… भारत सरकार

या देशाचं नाव मोदी सरकार नाही तर भारत सरकार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, पूर्वी वाटायचे, देश मजबूत हवा असेल तर एकच पक्ष मजबूत पाहिजे. पण आता कळून चुकलं आहे की, एका पक्षाला कौल मिळाला की मोदींसारखा हुकूमशहा निर्माण होतो. म्हणून देशात संमिश्र सरकारच यायला हवे, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

या वेळी उपनेत्या ज्योती ठाकरे, विजय कदम, विशाखा राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख मिलिंद वैद्य, ममता चेंबूरकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, विकास मोरे, पंकज देशमुख, गटनेते जयेंद्र दुबळा, माकपचे आमदार विनोद निकोले, राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा, महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी, सहसंपर्कप्रमुख नीलेश गंधे, माकप पॉलीट ब्युरोचे कॉ. अशोक ढवळे, एकता परिषदेचे काळुराम धोदडे, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील, कॉ. किरण गहला, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, वाढवण युवा संघर्ष समितीचे मिलिंद राऊत, निर्भय बनो अभियानचे छबीदास गायकवाड, मच्छीमार नेते रामकृष्ण तांडेल, आदिवासी एकता परिषदेचे दत्ताराम करबट, मनिष गणोरे, संगीता धोंडे, अनिल गावड यांच्यासह शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मोदींच्या परिवारात फक्त मोदी आणि त्यांची खुर्चीच

मेरा इनसे पुराना रिश्ता है… मेरा इनसे पुराना नाता है… असे मोदींचे मीम्स सोशल मीडियावरून फिरतात. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, आता निवडणुकीच्या तोंडावर ते कदाचित इथेही येतील आणि हात जोडून म्हणतील, भाई और बहनो… पालघर से मेरा बहो।़।़।़त पुराना रिश्ता है (प्रचंड हंशा). कुठून कुठून यांचे रिश्ते काढतील काही सांगता येत नाही! अगर रिश्ता है तो रिश्ता निभाओ… नुसतं मोदी परिवार असे सांगून चालणार नाही. कारण मोदीजी, तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची असे दोघेच जण आहात, तिसरा कुणीच नाही, असे जोरदार फटकारे उद्धव ठाकरे यांनी लगावले.

गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरताहेत

सध्या निवडणुकीचं वारं वाहतंय आणि गद्दारांचे मालक महाराष्ट्रात फिरताहेत. कोण ते गद्दारांचे मालक हे तुम्हाला माहीत आहेच, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच मोदी-शहा… मोदी-शहा… असा आवाज गर्दीतून घुमला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी परवा पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले की, मी यापुढे जी टीका करेन ती देशाच्या पंतप्रधानांवर नसेल तर ती नरेंद्र मोदींवर असेल. देशाच्या पंतप्रधानांचा अवमान मी करू इच्छीत नाही. करणार नाही. पण निवडणुकीत ते इथे येतील. अरे तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी? तुम्ही बाहेरचे आहात. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी ज्या शिवसेनेला जन्म दिला तिला तुम्ही नकली म्हणता… नकली शिवसेना म्हणायला ती तुमची डिग्री आहे काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांच्या खंडणीखोर पक्षाचे दुसरे पार्टनर अमित शहा… तेपण बरळले, शिवसेना नकली है… पण मी सांगतो, भारतीय जनता पार्टी हा भाडखाऊ, भेकड आणि भ्रष्ट लोकांचा पक्ष आहे. माझे अमित शहांना आव्हान आहे, शहा, तुमच्या गाडीत निष्ठावंत किती आहेत ते बघा आणि स्टेपन्या किती बसल्या तेही बघा, असा टेला उद्धव ठाकरे यांनी लगावले.

भाजपवाल्यांनी ईडी, इन्कम टॅक्स आणि बंदुका लावून आमच्यातले गद्दार फोडले आणि त्यांना पालघरमधूनच गुजरातला नेले. म्हणून पुन्हा पालघरला आलोय. बघुया आता कोण पळून जातोय.

उद्धव ठाकरे यांचा लोकलने परतीचा प्रवास; प्रत्येक स्थानकावर प्रचंड स्वागत

उद्धव ठाकरे यांचे बोईसर रेल्वे स्थानकावर आगमन होताच शिवसैनिकांसह प्रवाशांची स्टेशन परिसरात तुडुंब गर्दी झाली. प्रवाशांनी हात उंचावून आणि घोषणा देत उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिवादन स्वीकारत त्यांना प्रतिसाद दिला. उद्धव ठाकरे यांनी मुंबईचा परतीचा प्रवास गाडीने न करता लोकलने केला. आंबटगोड मैदानावरील सभेनंतर उद्धव ठाकरे यांनी बोईसर रेल्वे स्थानकातून सायंकाळी 7.28च्या चर्चगेट लोकलने प्रवास केला. उद्धव ठाकरे लोकलच्या ज्या डब्यात बसले हेते त्या डब्याभोवती प्रवाशांचा गराडा पडला होता. उद्धव ठाकरे यांनी हात उंचावून या सर्वांना अभिवादन केले. बोईसर, उमरोळी, पालघर, केळवा, सफाळे, वैतरणा तसेच पुढील सर्वच स्थानकांवर उद्धव ठाकरे यांचे प्रवाशांनी ठिकठिकाणी स्वागत केले. त्यांना पाहण्यासाठी लोकलच्या खिडकीभोवती प्रचंड गर्दी होत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

 

वाढवण पोर्ट नको… एअरपोर्ट बनवू!

पालघर जिल्हा हा निसर्गाने नटला आहे. इथे पर्यटनाला वाव देणारी अनेक स्थळे आहेत. का पालघरचा विकास करत नाही? का इथल्या जनतेचा पाण्याचा प्रश्न अजून सुटला नाही? इथले चांगले उद्योगधंदे गुजरातला पळवायचे आणि विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्रावर लादायचे. हे कारस्थान यापुढे होऊ देणार नाही. केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यावर पालघरचा सर्वांगीण विकास करू. वाढवण पोर्टच्या ऐवजी इथे विकासाला चालना देणारे एअरपोर्ट उभारू, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

मोदी आणि शहा विनाशकारी, त्यांना नष्ट करा – संजय राऊत

जेव्हापासून दिल्लीत मोदी-शहा सत्तेत आले आहे तेव्हापासून महाराष्ट्रावर विनाशकारी प्रकल्प लादले जात आहेत. कोकणात रिफायनरी आणि पालघरमध्ये वाढवण बंदर माथ्यावर मारले जात आहे. या विनाशकारी मोदी-शहांना नष्ट करा, असा जबरदस्त घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.  आंबटगोड मैदानावरील ही प्रचंड गर्दीची सभा बघून विरोधकांचे तोंड आंबट झाले असेल.या देशात क्रांतीची सुरुवात झाली आहे. भगव्यासोबत लाल बावटाही आला आहे. अबकी बार चारसो पार… अशा घोषणा भाजपवाले देत आहेत. लोकशाही तुमच्या बापाची आहे काय? असा सवाल करतानाच या देशात संविधान वाचवायचे असेल, कष्टकऱयाला टिकवायचे असेल तर भाजपला हद्दपार करावेच लागेल, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. पालघरच्या मतदारसंघातील आमदार, खासदार गद्दार झाले. पण भुसारा आणि निकोलेंसारखे निष्ठावंत लोकप्रतिनिधी खोक्याच्या आमिषाला बळी पडले नाहीत, असेही ते म्हणाले. काळजीवाहू पंतप्रधान महाराष्ट्रात फौजफाटय़ासह येतात आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे असे म्हणतात. हा गुजरातचा माल आम्हाला नकली आहे असे म्हणतो, पण आमच्याशी टक्कर घ्याल तर इथेच गाडले जाल, असा इशारा राऊत यांनी दिला. भारती कामडी विरोधकांचे डिपॉझीट जप्त करून विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.