मुंबईला उकिरडा करण्याचा विचार आहे का ? उद्धव ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला देण्यात आले आहे. धारावीतील लोकांचे त्यांच्या उद्योगांसह तिथल्या तिथेच पुनर्वसन झालेच पाहिजे अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली असून धारावीकरांवर पुनर्विकासात कोणताही अन्याय होऊ नये यासाठी 16 डिसेंबर रोजी शिवसेना एक भव्य मोर्चा काढणार आहे. धारावी ते अदानी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. ठाकरे यांनी म्हटले की, मुंबई संघर्ष करून मराठी माणसाने मिळवलेली आहे, ती आंदण दिलेली नाही आणि आम्हीही ती कोणाला आंदण देऊ देणार नाही. सरकार, अदानीला जाब विचारण्यासाठी 16 तारखेला शिवसेनेचा प्रचंड मोर्चा काढणार आहे. धारावीतून हा मोर्चा अदानी कार्यालयावर जाईल. कोणी गुंडगिरी करायला आला तर शिवसेनेकडे या, शिवसेनेचे मर्द शिवसैनिक या गुंडांना सरळ केल्याशिवाय राहणार नाही.

मुंबईबाहेर पळवले जाणारे उद्योग थांबले पाहिजे. सगळं मुंबईचे गुजरातला नेणार म्हणजे मुंबईला उकिरडा करण्याचा विचार आहे का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. मुंबई एका माणसाच्या घशात घालायचा प्रयत्न करत आहात, हे सहन करणार नाही, असे ते म्हणाले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या टीडीआरचा मुद्दा हा मोठा आहे. टीडीआर कशाच्या आधारे काढला आहे?टीडीआर बँक अदानींच्या ताब्यात देणार आहे का? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले असून सध्याच्या परिस्थितीत टीडीआरद्वारे अदानींचे पहिले भले होईल असे दिसत असून हे आम्हाला मान्य नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. धारावीमध्ये पहिले सर्वेक्षण झाले पाहिजे. त्यासाठी कुठेही दमदाटी चालणार नाही. कोणत्याही प्रकल्पासाठी पहिले जनतेकडून सूचना,आक्षेप मागवले जातात. ते घेण्यापूर्वीच प्रकल्पासाठी सरकारने हमी दिली आहे, हे सरकारने कशाच्या आधारे केले ? असा सवाल ठाकरे यांनी विचारला.

 हे सरकार कंत्राटदारांसाठी काम करतंय असा आरोप ठाकरे यांनी पुन्हा एकदा मिंधे सरकारवर केला. अभ्युदय नगर, आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लमेशनचा पुनर्विकासही अदानींना देण्यात येण्याचे घाटते आहे. वीज बिलेही अमाप यायला लागली आहे. त्याचेही कंत्राट अदानीकडे आहे, या सगळ्याचाच सोक्षमोक्ष एकदाच लावण्याची वेळ आली आहे असे ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.