शिवसेनेला ‘पटकणारा’ जन्माला यायचाय! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

आम्हाला लेचेपेचे समजू नका. तुमच्या कितीही पिढया उतरल्या तरी शिवसेना को पटकनेवाला अभी तक पैदा नहीं हुआ और होगा भी नहीं, असा जबरदस्त तडाखा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपच्या अध्यक्षांना लगावला. येत्या निवडणुकीत युती नाही झाली तर विरोधियों के साथ साथ मित्रों को भी पटक देंगे अशी टिमकी वाजवणारे अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. जनतेचा, मित्रांचा विश्वास कमावला तर पानिपतचेच काय कोठलेही युद्ध जिंकता येते असा सणसणीत टोला हाणतानाच उद्धव ठाकरे यांनी लाट, कसली लाट? त्या लाटेची आम्ही वाट लावू. आमची वाट ही भगव्याची आहे, असे ठणकावून सांगितले.

शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अधिवेशन वरळी येथील वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडले. या अधिवेशनाला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 2019 नव्हे तर त्यानंतरचीही सर्व वर्षे आपलीच असणार असे उद्धव ठाकरे ठामपणे सांगताच सभागृहात टाळयांचा कडकडाट झाला. ‘कोणी कोणाशी युती केली तर काय होईल, कोणाची टक्केवारी वाढेल, मते किती वाढतील अशाच चर्चा सध्या देशात सुरू आहेत. माझ्या देशाचे काय होणार याबाबत कोणालाच काही पडलेले नाही. मला चिंता आहे ती देशाची. देश कसा सुधारेल, उत्पन्न कसे वाढेल याचा विचार व्हायला हवा असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

स्थानीय लोकाधिकार समिती हा शिवसेनेचा पाठकणा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयानंतर मराठी माणसाला मान खाली घालून जगायला भाग पाडले जात होते. त्यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनगटात ताकद आल्यानंतर तो काय करतो याची जाणीव करून दिली होती असे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकाधिकार महासंघाच्या कार्याची प्रशंसा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. कोणतेही काम सांगितले की ते यशस्वीरीत्या पूर्ण केल्याशिवाय लोकाधिकारचा मावळा मागे परतत नाही असे सांगतानाच लोकाधिकारचे हे कार्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिज असे ते म्हणाले.

मजबूत सरकार काय चुलीत घालायचंय
मजबूत सरकार आल्यानंतर देशातल्या नव्हे तर देशाच्या विरोधकांचा गळा चेपणारा पंतप्रधान नसेल, तो आमच्याच छाताडावर बसणारा असेल तर मग असे मजबूत सरकार काय चुलीत घालायचंय अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ‘इंदिरा गांधी यांचे सरकार मजबूत होते. त्या सरकारने पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. अटलजींचे सरकार मिलंजुलं सरकार होते. ममता, जयललितांनी त्यांना परेशान करून टाकले होते. तरीही अटलजींनी कारगील युद्ध जिंकले होते आणि अणुचाचण्याही यशस्वीरीत्या केल्या होत्या’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

नाव येडे, पण तिने शहाणपणा शिकवला…
शेतकऱ्याच्या विधवा पत्नी वैशाली येडे यांनी यवतमाळच्या साहित्यसंमेलनात केलेल्या भाषणाची प्रशंसा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. ‘नाव वैशाली येडे, पण तिने शहाणपणा शिकवला. पर्याय उरला नाही म्हणून पतीने आत्महत्या केली असे या भगिनीने सांगितले. पण आत्महत्या हा पर्याय नाही, मला लढलेच पाहिजे, मी लढणार असे ती म्हणाली. मी ज्योतिषाला हात नाही दाखवत, पण अंगाला कुणी हात लावला तर तो मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असेही तिने बजावले. हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

रामाचा पत्ता नाही आणि रामराज्य आहे असे सांगताय?
राममंदिराच्या मुद्दयावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये आणि अच्छे दिन हे जसे जुमले होते तसाच राममंदिर हासुद्धा जुमला होता का, असा सवाल करतानाच राममंदिराचाही जुमला करता तर तुमच्या कामात राम आहे कुठे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी हे विष्णूचे तेरावे अवतार असूनही मंदिर बांधू शकलेले नाहीत. कदाचित विष्णू हे त्यांचे पहिले अवतार असावेत असे उद्धव ठाकरे म्हणताच सभागृहात एकच हशा उसळला. नितीशकुमार, रामविलास पासवान यांच्यासारखे राममंदिराला विरोध करणारे सोबतीला घेऊन तुम्ही मंदिर बांधणार कसे? रामाचा पत्ता नाही आणि रामराज्य आहे असे सांगताय? असे सवालही उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेना निवडणुकीसाठी राममंदिर मुद्दा घेत आहे अशी टीका करणाऱयांनाही उद्धव ठाकरे यांनी चोख उत्तर दिले. होय, मी निवडणुकीसाठीच मंदिर मुद्दा घेतला असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले.

‘हमे तो मजबूत सरकार चाहिए, विरोधी है उन्हे मजबूर सरकार चाहिए’ असे नरेंद्र मोदी हे भाजपच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात म्हणाले होते. त्याचा संदर्भ देताना उद्धव ठाकरे यांनी ‘एक वेळ सरकार मजबूर असले तरी चालेल पण माझा देश मजबूत असला पाहिजे’ असे सांगितले. यापूर्वी मजबूत सरकार आणि मिलंजुलं मजबूर सरकार असताना देश पुढे गेला की मागे राहिला याचा आढावा घेऊन जनतेलाच निर्णय करू द्या असे ते म्हणाले.

…तर तुमचे सिंहासन जळून खाक होईल!
लोकांच्या मनात भ्रम निर्माण कराल तर तुमची सिंहासने जळून खाक होतील असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱयांना दिला. ‘ग्रामीण भागात पाण्यासाठी आजही मातांना पायपीट करावी लागते. दगडी रस्त्यांवरून त्यांचे पाय रक्ताळतात. मग अशा महिलांना डांबरी रस्त्यावर नेऊन मृगजळ दाखवले जाते. पाय भाजत असतानाही पाण्याच्या आशेने त्या जातात. 2014 ला सांगितले जाते 2019 ला पाणी येईल, 2019 ला सांगितले जाते 2024, नंतर 2028. असेच चालू ठेवायचे. या मृगजळामुळे लोकांचे आयुष्य करपून जाते. या लोकांना ते मृगजळ आहे हे कळले आणि त्यांच्या तळपायाची ती आग मस्तकात गेली तर तुमची सिंहासने जळून खाक होतील’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेली व्यक्ती आर्थिक दुर्बल असेल तर मग8 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करा! संसदेत मागणी करण्याचे शिवसेना खासदारांना आदेश

आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या सवर्णांना आर्थिक दुर्बल म्हणून आरक्षण देणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आठ लाख रुपये उत्पन्नवाल्या सर्वांचाच इन्कम टॅक्सही माफ करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ही मागणी संसदेत उचलून धरण्याचे आदेश त्यांनी शिवसेना खासदारांना दिले.
देशातील आर्थिक दुर्बल सवर्णांना केंद्र सरकारने दहा टक्के आरक्षण मंजूर केले. आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले सवर्ण त्या आरक्षणासाठी पात्र ठरणार आहेत. आठ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना आर्थिक दुर्बल म्हणून आरक्षण मिळाले असताना दुसरीकडे अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांकडून इन्कम टॅक्स घेतला जातो. ही तफावत दूर व्हायला हवी असे सांगतानाच आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांचाही इन्कम टॅक्स माफ केला जावा अशी मागणी सर्व खासदारांनी संसदेत करावी असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांना दिले. ही मागणी मान्य केल्यास मोदींची 56 काय 256 इंच छातीही मान्य करायला हरकत नाही असे ते म्हणाले.

‘बेस्ट’च्या एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही! संपात राजकारण नको. अवाजवी मागण्या करू नका, आणखी समस्या निर्माण होतील.

बेस्ट कामगारांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून त्यामध्ये राजकारण आणू देणार नाही. जी वेतनश्रेणी ठरली ती मान्यताप्राप्त युनियनसोबत झालेल्या करारानुसारच. त्यानुसारच पगार होत आहेत. पण सध्याची बेस्टची आर्थिक स्थिती बिकट असली तरी कर्मचाऱयांच्या तोंडाला पाने पुसणार नाही. त्यांच्या जे हक्काचं आहे ते त्यांना दिलं गेलंच पाहिजे. पण अवाजवी मागण्या करू नका, आणखी समस्या निर्माण होतील. बेस्टला तोटयातून बाहेर काढताना सुधारणा कराव्या लागल्या तरी एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही याची जबाबदारी शिवसेनेची आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिली. बेस्टच्या मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संपाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. उद्धव ठाकरे म्हणाले, बेस्टमधला मराठी माणूस शिवसेनेसोबत आहे. या बेस्ट कर्मचाऱ्यांशी आणि मुंबईकरांशी आम्ही बांधील आहोत. त्यांच्या जे काही हिताचं आहे ते मी करायला तयार आहे. उगाचच अवाजवी मागण्या मागितल्या आणि बेमुदत संप केला तर एक दिवस असा येईल की पगार देणेही कठीण होऊन जाईल.

संपावर एकत्र येऊन तोडगा काढू
बेस्टची आर्थिक स्थिती ही कर्मचाऱयांच्या मान्यताप्राप्त युनियनच्या प्रतिनिधींनाही माहिती आहे. ज्या वेतन करारानुसार कर्मचाऱयांना वेतन मिळत आहे त्या वेतन करारावर तत्कालीन युनियनचे नेते शरद राव यांनीच स्वाक्षरी केली आहे. आता या करारात काही चुका राहिल्या त्यांची दुरुस्ती करण्यासाठी संप सुरू आहे. या संपाच्या तिसऱ्या दिवशीच युनियनसोबत चर्चा झाली होती. त्यांनीही आपले म्हणणे कळवतो असे सांगितले, मात्र दुसऱयाच दिवशी हे प्रकरण कोर्टात गेले आहे. त्यामुळे संपावर एकत्र येऊन लवकरात लवकर तोडगा काढायला हवा. चर्चेतून हा प्रश्न सुटायला हवा आणि त्यासाठी कितीही वेळ द्यायला मी तयार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बेस्ट कर्मचारी आणि मुंबईकरांना मी बांधील
बेस्टचा तोटा जर वाढत जाणार असेल तर हा प्रश्न केवळ बेस्ट किंवा महापालिकेचा राहत नाही. तर तो प्रश्न मुंबईकरांचा होतो. तोटा वाढला तर तमाम मुंबईकरांच्या विकासकामांना, सोयीसुविधांना कात्री लागण्याची शक्यता आहे. ते होता कामा नये. बेस्ट कर्मचाऱ्यांना आणि मुंबईकरांना मी स्वतः बांधील आहे. कुणाचंही नुकसान होऊ न देता मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणे हे माझे कर्तव्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्र होणार
बेस्टचा आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित करण्याचं मी वचन दिलं होतं. त्यानुसार एक ठरावही करण्यात आला आहे. पण हे एकत्रीकरण करताना बेस्टला तोटयातून बाहेर काढावं लागेल. ना नफा, ना तोटा तत्त्वावर ही सेवा चालविण्यासाठी त्यात काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या सुधारणा करताना त्यामध्ये कंत्राट हा एक वादाचा मुद्दा आहे. पण काही रूट जर कंत्राट पद्धतीने केले गेले तरी यामुळे माझ्या बेस्ट कर्मचाऱयांच्या नोकरीला धक्का लागणार नाही अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. खासगीकरणाचा बागुलबुवा केला जातोय. पण बेस्टचं पूर्णतः खासगीकरण होणार नाही. बेस्टच्या अतिरिक्त जागा ज्या विकासकांना देण्यात आल्या त्यांच्याकडून 300 ते 350 कोटी अद्याप आलेले नाहीत. प्रत्यक्षात एक हजार कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी हे पैसेही पुरेसे पडणार नाहीत. पण हे पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न केले जायला हवेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.