षण्मुखानंद सभागृहात आज सायंकाळी शिवसैनिकांचा मेळावा, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुला वंदितो आज चैतन्यशक्ती, उफाळून ये रोज सर्वांतरी!

तुझ्या प्रेरणेने घडो राष्ट्र माझे, जगी दिव्य तेजाळ सूर्यापरी!!

23 जानेवारी हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आणि दैनिक ‘सामना’चा वर्धापनदिन. त्यानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात उद्या शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. शिवसेनेशी झालेली गद्दारी, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, खोके सरकारचे घोटाळे, आगामी महानगरपालिका निवडणुका, वाढती महागाई, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी आणि बेरोजगारी यासह देशातील विविध मुद्दय़ांवर उद्धव ठाकरे कसा हल्लाबोल करतात याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर हा मेळावा होत असल्याने उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे मुंबई महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन आणि दैनिक ‘सामना’चा वर्धापनदिन मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. राज्यासह देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. कोरोनामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गेली दोन वर्षे हे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे केले गेले. यंदा दोन वर्षांनंतर षण्मुखानंद सभागृहात मेळावा होत आहे. सध्याची राजकीय व सामाजिक स्थिती पाहता या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या सहा महिन्यांतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे या मेळाव्यातील मार्गदर्शन शिवसैनिकांना नवी दिशा देणारे ठरणार आहे. त्यामुळे केवळ शिवसेनाच नव्हे तर सर्व राजकीय पक्षांना त्याबद्दल कुतूहल आहे. या मेळाव्यासाठी षण्मुखानंद सभागृह परिसरात पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे.

आमने-सामने

शिवसैनिकांच्या मेळाव्याप्रसंगी सध्या तुफान गाजत असलेल्या  ‘आमने सामने’ या मराठी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. लीना भागवत, रोहन गुजर, केतकी विलास आणि मंगेश कदम यांच्या अभिनयाने नटलेल्या या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन नीरज शिरवईकर यांनी केले आहे.

शिवसेनाप्रमुखांना भक्तिभावाने अभिवादन करण्यासाठी दक्षिण मुंबईतील रिगल सिनेमासमोरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळय़ासमोर एका विशेष सोहळय़ाचे आयोजन उद्या सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे.  त्या सोहळय़ाला उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते, उपनेते, खासदार, आमदार, शिवसेनेशी संलग्न संघटनांचे पदाधिकारी,  विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांसह सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा सैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित  राहणार आहेत. तमाम जनतेच्या वतीने यावेळी शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यात येईल. या विशेष अभिवादन सोहळय़ानंतर उद्धव ठाकरे हे षण्मुखानंद सभागृहातील मेळाव्यासाठी रवाना होतील.

विधान भवनातील तैलचित्राचे अनावरण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात येणार आहे. त्या तैलचित्राचा अनावरण सोहळा उद्या, 23 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या सोहळय़ासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवनाच्या पाचव्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.