क्षुल्लक कारणावरून उदगीर येथे कार जाळून चाकूने भोसकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

लातूर येथे अंगावर कार येत असल्याने दिसत नाही का म्हणून विचारणा करणाऱ्या युवकास शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. चाकूने भोसकले आणि कार जाळून टाकण्यात आली. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश धमेंद्र बिरादार रा. लोहारा याने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 6 मार्च रोजी रात्री 9.30 वाजता फिर्यादी व त्याच्या सोबत संभाजी रुक्माजी पाटील, धिरज शिवाजी हालकुडे हे जिल्हा परिषद शाळेजवळील केशव वसंतराव चिट्टे यांच्या दुकानासमोरील रस्त्यावर असताना इंडिका कार क्रमांक एम.एच. 23 ई 5113 ही आली. कार अंगावर येत असल्याने फिर्यादीने त्यांना दिसत नाही का असे म्हटले. कारमधून तिघे उतरले आणि शिवीगाळ करुन मारहाण सुरू केली. त्यामध्ये सुमित अष्टूरे, आकाश कांबळे उर्फ गेल, सुरज तलवारे, यांचा समावेश होता. गावातील विजयकुमार कांबळे हा पळत आला व मारा मारा म्हणून लाथाबुक्यांनी मारहाण सुरू केली.

सुरज तलवारे याने हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटात भोसकले त्यामुळे पोटातील आतडे बाहेर आले. तर आकाश कांबळे हा चाकूने मारत असताना संभाजी पाटील याने हाताने अडवले असता त्याच्या हाताच्या बोटाला चाकू लागल्याने तो जखमी झाला. विजयकुमार कांबळे याने गाडीला आग लावली आणि दुसऱ्या कारमधून ते पळून गेले. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात या मारहाण प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.