उंदेरी किल्ल्याने घेतला मोकळा श्वास, सह्याद्री प्रतिष्ठानने राबवली स्वच्छता मोहीम

666

महाराष्ट्राच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक गड-किल्ले आज जीर्ण झाले आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी अनेक सामाजिक संस्था, आणि युवा कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झटत आहेत. त्याच प्रमाणे सह्याद्री प्रतिष्ठान या गडकोटांचे संवर्धन करणाऱ्या सामाजिक संस्थेचे कामही उल्लेखनीय आहे. प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उंदेरी किल्ल्यावरही संवर्धन मोहीम राबविण्यात आली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे उंदेरी किल्ल्याने मोकळा श्वास घेतला आहे. या मोहिमेत लहान बालकांपासून ते तरुण, वयोवृद्ध यांसर्वांच्या सहभागातून या किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली आहे.

उंदेरी किल्ल्याची तटबंदी ही झाडाझुडपाने वेढली आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढले होते. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे प्रतिष्ठानच्या वतीने या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आता या किल्ल्याने मोकळा श्वास घेतला आहे. 1680 मध्ये सिद्धींनी बांधलेला हा किल्ला आहे. उंदेरी या जलदुर्गावर जाण्यासाठी आपल्याला अलिबागला यावे लागते. अलिबाग ते रेवस या मार्गावर अलिबागपासून 4 कि.मी.अंतरावर थळ गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून 3 कि.मी.वर थळ गाव आहे. थळजवळच्या समुद्रकिना-याहून दिसणारी दोन बेटे आपले लक्ष सहज वेधून घेतात. यापैकी जवळ दिसणारे बेट म्हणजे उंदेरी तर डाव्या बाजुला थोडे लांब असणारे बेट म्हणजे खांदेरी.

साधारण मध्यम आकाराच्या 5 ते 6 लोक बसू शकतील अशी होडी संपूर्ण खांदेरी- उदेरी दाखवून परत आणतात. उंदेरी किल्ला थळच्या समुद्रकिनाऱ्यावरून 1 कि.मी. वर तर खांदेरी किल्ल्याहून पूर्वेला 1 कि.मी.अंतरावर आहे. खांदेरी किल्ल्याप्रमाणे उंदेरीवर पण दोन कमी उंचीच्या टेकड्या आहेत. उंदेरी किल्ल्याकडे होडीने जात असतानाच उंदेरीची मजबूत तटबंदी आणि बुरुज आपले लक्ष वेधून घेतात.

खांदेरी किल्ल्यावर ज्याप्रमाणे बोटींना धक्क्याची सोय आहे ती सोय उंदेरीवर नाही. त्यामुळे उंदेरीवर भरती ओहटीची वेळ पाळूनच जावे लागते. ज्या ठिकाणी बोटी लागतात तेथून किल्ल्याच्या तटबंदीवर पडझड झालेल्या दगडांवरून चालत जावे लागते. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आपण बोटीने जेथे उतरतो त्याच्याच पुढील भागात आहे. प्रवेशदाराची कमान आजही शाबूत असून दरवाजासमोर पायऱ्या व दगडाची बांधीव वाट आहे. दरवाजावर कोणतेही वास्तुशिल्प नाही. उंदेरीला एकूण दहा बुरुज असुन बहुतेक सर्व बुरुज चांगल्या स्थितीत आहेत. बऱ्याच बुरुजावर तोफा आहे. खांदेरीच्या मानाने हे बेट खूपच लहान असून मध्यभागी पठारासारखे सपाट मैदान दिसते. त्यावर अनेक भुईसपाट झालेल्या इमारतींची जोती शिल्लक राहिलेली दिसतात. मध्यभागी एका वाड्याचे भग्न झालेले अवशेष व दरवाजाची कमान तग धरून शिल्लक आहे.

शासनाने या किल्ल्याकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यामुळे पर्यटकही मोठ्या प्रमाणात या किल्ल्याकडे आकर्षित होतील अशी मागणी सहयाद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केली आहे. उंदेरी किल्यावर दोन तोफांचे रणगाडे बसविण्याची परवानगी सह्याद्री प्रतिष्ठानला मिळालेली असल्याची माहिती गणेश रघुवीर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या