
राजकुमार भगत, न्हावाशेवा
विकासकांनी उरण तालुक्यातील रस्त्याच्या बाजूच्या जमिनी विकत घेऊन त्या ठिकाणी मोठ मोठाले भराव केल्याने शेतातील तसेच गावातील पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद केल्याने यावर्षी उरण तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. खोपटे पासून आवरे पर्यंत तसेच कोप्रोली पासून चिरनेर पर्यंत तसेच दिघोडे ते दास्तान फाटा या रस्त्यावरील पाणी वाहण्याचा मार्ग असलेल्या मोऱ्यांच्या तोंडावरच स्थानिक ग्रामपंचायत, तलाठी, मंडळ अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्गाना हाताशी धरुन दगड मातीचा भराव केले आहेत. त्यामुळे यंदा उरण तुंबणार आहे.
उरण तालुक्याचा औद्योगिक दुष्ट्या झपाट्याने विकास होत आहे.या विकासात मोठ्या प्रमाणात विकासक आपले व्यवसाय, कंटेनर यार्ड उभारण्यासाठी नागरीकांच्या रहदारीच्या रस्त्यालगत, नैसर्गिक नाल्या लगत आणि खाडीकिनाऱ्या लगत शासकीय नियमांची पायमल्ली करून दगड मातीचा भराव करत आहेत.त्यामुळे दरवर्षी येथील रहिवाशांना समुद्रातील उधाणाच्या पाण्याचा, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
या घटनांना जबाबदार असणाऱ्या विकासकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी येथील रहिवासी स्थानिक ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाकडे तक्रार अर्ज करून उरण तालुक्यातील आमसभेत आपल्या समस्या मांडण्याचे काम करीत आहेत.परंतू स्थानिक ग्रामपंचायत, उरण तालुक्यातील तहसिलदार श्रीमती कल्पना गोडे ,उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एन.एन.गाडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अनिल करपे यांना उरण तालुक्यातील रहिवाशांच्या समस्यांकडे आणि आपत्कालीन परिस्थितीकडे लक्ष केंद्रित करण्यास वेळ मिळत नसल्याने उरण तालुक्यातील अनेक गावांतील रहिवाशांना दरवर्षी समुद्रातील उधाणाच्या पाण्याचा आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
त्यात सध्या तर उरण तालुक्यातील विकासकांनी स्थानिक ग्रामपंचायत, महसूल विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना हाताशी धरून चक्क तालुक्यातील खोपटा पुल ते चिरनेर ते गव्हाणफाटा आणि दिघोडे ते दास्तान फाटा नागरिकांच्या रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या मोऱ्यांच्या तोंडावरच दगड मातीचा भराव टाकण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यालगत, गाव परिसरात तुंबल्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी भीती येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत.
या संदर्भात उरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अनिल करपे यांना विचारणा केली असता मी पाहणी करणार असून आपत्कालीन व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यावर उपाय योजना करणार आहोत.तसेच उरण तहसिलदार आणि तालुका आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्य असलेल्या कल्पना गोडे यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्याना फोन उचलायला देखिल वेळ मिळत नसल्याने त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.


























































