
एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत करार झाल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे मात्र दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेच्या सैन्याने तेहरानच्या ड्रोन कमांड तळांवर जोरदार हल्ले केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने या आठवड्याच्या शेवटी इराणच्या गोरुक आणि केशम बेटांवरील रडार आणि ड्रोन नियंत्रण केंद्रांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर या कारवाईची माहिती दिली. इराणने आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीवरून उड्डाण करणारे अमेरिकेचे ‘MQ-1’ हे ड्रोन पाडल्याचे सेंटकॉमने म्हटले आहे. इराणच्या या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी अमेरिकेने हे हवाई हल्ले केले. या कारवाईत अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणची हवाई सुरक्षा प्रणाली, एक भू-नियंत्रण केंद्र आणि दोन ड्रोन पूर्णपणे नष्ट केले. या संपूर्ण मोहिमेत अमेरिकेचे कोणतेही लष्करी जवान जखमी झाले नसल्याचे वॉशिंग्टनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने या हल्ल्याला दुजोरा दिला असून अमेरिकेला प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे. सिरिक बेटावरील दूरसंचार टॉवरवर झालेल्या अमेरिकन हल्ल्याचा बदला म्हणून इराणच्या हवाई दलाने अमेरिकेच्या एका हवाई तळाला लक्ष्य केल्याचे आयआरजीसीने सोमवारी सांगितले. मात्र, सुरक्षा कारणास्तव इराणने या हवाई तळाच्या अचूक ठिकाणाचा खुलासा केलेला नाही.
गेल्या आठवड्यापासून दोन्ही देशांमध्ये एकमेकांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू आहेत. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणच्या ड्रोन तळांना लक्ष्य केले होते, त्यानंतर संतप्त झालेल्या इराणने अमेरिकेच्या तळावर हल्ला चढवला. एका बाजूला शांततेच्या आणि कराराच्या चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने आखाती देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे.




























































