हिंदी महासागरात चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी अमेरिका-मालदीवमध्ये संरक्षण करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदी महासागराच्या क्षेत्रात शांतता राखण्यासाठी आणि या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने मालदीवसोबत संरक्षण करार केला आहे. सध्या चीनचा हिंदी महासगारात हस्तक्षेप वाढत असल्याने अमेरिकेने या क्षेत्रात शांततेसाठी मालदीवसोबत संरक्षण करार केला आहे. अमेरिकेचा संरक्षण विभाग म्हणजेच पेंटागनकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. हिंदी महासगारातील चीनचा हस्तक्षेप रोखण्यासाठी या क्षेत्रातील देशांशी सहकार्य वाढवण्यावर ट्रम्प प्रशासनाचा भर आहे. त्यामुळे आता अमेरिकेने मालदीवशी संरक्षण करार केला आहे.

फिलाडेल्फियामध्ये 10 सप्टेंबरला अमेरिकेचे दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाचे उप सहाय्यक संरक्षणमंत्री रीड वर्नर आणि मालदीवचे संरक्षणमंत्री मारिया दीदी यांनी संरक्षण आणि सुरक्षा करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे पेंटागनकडून सांगण्यात आले. मालदीव आणि अमेरिकेमध्ये झालेला संरक्षण करार महत्वाचा असल्याचे मालदीवकडून सांगण्यात आले. हिंदी महासागराच्या क्षेत्रात शांतता राखण्यासाठी या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी उचलण्यात आलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. या करारामुळे दोन्ही देशातील संवाद आणि सहकार्य वाढणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती, बचाव कार्य आणि परस्पर सहकार्य यावरही दोन्ही देशांनी भर दिला आहे.

जगभरात वाढणाऱ्या कोरोना संकटाबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा करण्यात आली. संरक्षण आणि सुरक्षा याबाबतच्या सर्व बाबींवर चर्चा झाली असून दोन्ही देशांनी या क्षेत्रात शांतता राखण्यासाठी सहमती दर्शवली आहे. हिंदी महासागर, प्रशांत महासागर आणि दक्षिण चीन सागरात चीन वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच हिंदी महासागरात चीनचा हस्तक्षेप वाढत आहे. या क्षेत्रात हिंदुस्थानच्या व्यापक भूमिकेवरही अमेरिकेने जोर दिला आहे. त्यामुळे हिंदी महासागरातील चीनचा हस्तक्षेप रोखण्यासाठी अमेरिकेकडूनही मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.