
सामना प्रतिनिधी । अंबाजोगाई
फोनवरील संभाषणातून महापुरुष आणि एका विशिष्ट समाजाबद्दल कथितरित्या अपशब्द वापरणाऱ्या मोहन आचार्यला पोलिसांनी शनिवारी रात्री उदगीर येथून ताब्यात घेतले असून त्याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन दिवसापासून सदरील संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल होऊन तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली.
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रशांत आद्नाक यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्यांना ही ऑडीओ क्लिप मिळाली होती. त्यांनी ती ऐकली असता त्यात मोहन अंतराम आचार्य आणि रमेश नामदेव गडसिंगे या दोघांमधील फोनवरील संभाषण होते. या संभाषणात मोहन आचार्य याने महापुरुषांबद्दल आणि एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह्य भाषा वापरली. तसेच, भीमा-कोरेगाव दंगलीबाबत काही वादग्रस्त दावे करून २ समाजात तेढ निर्माण करणारी भाषा त्याने वापरली होती. तर, रमेश गडसिंगे याने ही क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल केली. त्यामुळे, आचार्य आणि गडसिंगे यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार प्रशांत आद्नाक यांनी अंबाजोगाई शहर पोलिसात दिली. सदर तक्रारीवरून मोहन अंतराम आचार्य आणि रमेश नामदेव गडसिंगे या दोघांवर कलम २९५-अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक मुंडे करत आहेत.
उदगीरमधून केली अटक
दरम्यान, ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. पोलीस ठाण्यात काही संघटनांनी दोषींवर कडक कारवाईसाठी निवेदनेही दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबाजोगाई पोलिसांनी तातडीने कारवाई करत मोहन आचार्यला ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा कामास लावली होती. अखेर शनिवारी रात्री आचार्यला उदगीरमधून ताब्यात घेण्यात आले. दुसरा आरोपी गडसिंगे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कोणीही सदरील वादग्रस्त क्लिप इतरत्र फोरवर्ड करू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.


























































