मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Devendra fadanvis chief minister maharashtra

मराठी ही केवळ संपर्क आणि संवादाची भाषा नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची वाहक, इतिहासाची साक्ष आणि ज्ञानाची परंपरा पुढे नेणारी भाषा आहे. त्यामुळे मराठीचा केवळ अभिमान न बाळगता तिचा वापर, वावर आणि संशोधन सातत्याने वाढवून तिला आधुनिक ज्ञानभाषा बनविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठीच्या भविष्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह आणि अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ कार्यक्रमाचा शुभारंभ चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

भाषा टिकली तर संस्कृती-इतिहास टिकतो

एखादी भाषा संपली तर त्यासोबत त्या समाजाची संस्कृती, विचार, सभ्यता आणि परंपराही संपण्याचा धोका असतो. अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या मराठीच्या अस्तित्वाच्या संदर्भातून त्या काळातील संस्कृती, प्रथा आणि परंपरा समजून घेता येतात. त्यामुळे भाषा जिवंत आणि समृद्ध ठेवण्यासाठी तिचा वापर, वावर आणि संशोधन या तीनही बाबी सातत्याने वाढल्या पाहिजेत, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.