वंदे भारत ट्रेनला रेल्वे प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता वंदे भारत ट्रेनची निर्यात करण्यासाठी रेल्वेने पावले उचलली आहेत. उपकरण निर्माता बीईएमएल लिमिटेड कंपनीने यासंबंधी माहिती दिली आहे. वंदे भारत ट्रेनची निर्मिती करून ती निर्यात केल्यानंतर आगामी काळात संरक्षणासोबत रेल्वे आणि मेट्रोला मिळणारी मिळकत आणखी मजबूत होऊ शकते. अवघ्या काही वर्षांत वंदे भारत आणि मेट्रो ट्रेनच्या निर्यातीची विदेशातून ऑर्डर मिळणे सुरू होईल, असा आशावाद बीईएमएल लिमिटेडचे अध्यक्ष शांतनू रॉय यांनी व्यक्त केला आहे.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. आमचे सर्वात पहिले लक्ष्य म्हणजे स्वदेशी वंदे भारत ट्रेनला रेल्वे रुळावर व्यवस्थित मार्गावर आणणे आहे. त्यानंतर पुढील वर्षापासून या ट्रेनला निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे ते म्हणाले. बीईएमएल सध्या हिंदुस्थानी रेल्वेसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेनचे पहिले प्रोटोटाइप बनवण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी काळात हे काम पूर्ण होईल.
मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी काम केले जात आहे. यासोबत मिडल ईस्ट, साऊथ अमेरिका आणि आशियाई देशात वंदे भारत व मेट्रोची निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या एक्सपोर्ट रेट 4 टक्के आहे. याला 10 टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे लक्ष्य आहे. या दिशेने वेगाने पावले टाकले जात आहेत, असेही रॉय म्हणाले.