शिरूर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कवठे येमाई

सातत्याने दुष्काळाने होरपळत असलेल्या शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी या डोंगर पठारावरील गाव परिसरातील रस्त्यांची पूर्ण वाताहात झाली आहे. परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी असलेला एकमेव रस्ता वनवावाडी ते मिडगुलवाडी व पुढे कान्हूर मेसाई – सविंदणे रस्त्याला मिळणारा रस्ता स्वातंत्रपूर्व काळापासून दुर्लक्षित राहिल्याने उन्हाळ्यात फुफाटा व पावसाळ्यात चिखल अशी या रस्त्याची दयनीय अवस्था होत असल्याने आता हा अंदाजे 4 कि.मी. चा रस्ता तातडीने डांबरी करावा अशी मागणी मिडगुल वाडीचे सरपंच गणेश मिडगुले यांनी केली आहे.

शिरूरच्या पश्चिम भागातील बेट विभागातील वडनेर,जांबुत,फाकटे,चांडोह,कवठे येमाई,टाकळी हाजी,निमगाव दुडे या भागातील नागरिकांना शिक्रापूर-पुण्याकडे जाण्यासाठी एकमेव असणाऱ्या कवठे येमाई-कान्हूर मेसाई – खैरेवाडी – शिक्रापूर या डांबरी रस्त्याची पूर्ण वाताहात झाली आहे. कवठे ते मिडगुलवाडी घाट परिसरासह या संपूर्ण रस्त्यावर असंख्य खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याने सविंदणे- शिक्रापूर ही एकमेव एस टी बस दिवसातून एकदाच ये जा करीत असली तरी दुचाकी व इतर अनेक चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्याने सुरू असते.

या कामी लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाने हे काम मार्गी लावण्याकामी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी मिडगुलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश मिडगुले, माजी सरपंच सुनील मिडगुले, भीमा मिडगुले, सुरेश पोपळे, हरिभाऊ मिडगुले, संगीता पोपळे, प्रभावती मिडगुळे, बबन पोपळे, लक्ष्मण इचके, शरद पोपळे व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.