वसई किल्ल्यातील पुरातन चर्च धोकादायक; कोणत्याही क्षणी शिळा कोसळण्याचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठ्यांच्या विजयाचे प्रतीक असलेल्या वसई किल्ल्यातील पुरातन फ्रान्सिस्कन चर्च धोकादायक झाला आहे. त्यातील शिळा कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चर्चमधील छताच्या अंतर्गत भागातील या शिळा असून त्यातील काही आधीच पडल्या आहेत. एका शिळेचे वजन तब्बल ४५० ते ५०० किलो एवढे असून ती कोसळली तर पर्यटकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेला वसईचा किल्ला अखेरच्या घटका मोजत असून दुर्गप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान भुईकोट किल्ल्याच्या डागडुजीकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले असून या विभागाला जाग येणार तरी केव्हा, असा थेट सवाल वसईवासीयांनी केला आहे.

महाराष्ट्रार्ताल गड-किल्ल्यांच्या इतिहासात वसईच्या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तब्बल ११० एकर परिसरात किल्ला पसरला असून नरवीर चिमाजी आप्पा यांनी १७३९ मध्ये जुलमी पोर्तुगीजांच्या जोखंडातून तो मुक्त केला. या किल्ल्यावरील फ्रान्सिस्कन चर्चने प्रदीर्घ कालखंडात अनेक चढउतार अनुभवले आहेत. मात्र याच चर्चची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे. पुरातत्व विभागाने वेळीच लक्ष न दिल्यामुळे या चर्चच्या अवाढव्य शिळा आता कोसळू लागल्या आहेत. तर काही शिळा अर्धवट लटकलेल्या असून त्यातील एखादी शिळा खाली पडली तर मोठी गंभीर घटना घडू शकते.

धक्कादायक बाब म्हणजे छताच्या भागातून काही शिळा आधीच खाली कोसळल्या असताना अजूनही जवळपास २० हून अधिक महाकाय शिळा अत्यंत धोकादायक अवस्थेत लटकत आहेत.

‘फ्रान्सिस्कन’ चर्च हे पुरातन कालीन चर्च आहे. मागच्या महिन्यात तीन ते चार शिळा कोसळल्या. त्यामुळे या भागात पुरातत्व विभागाकडून सूचना फलक लावणे आवश्यक असल्याचे इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे.

चर्चच्या दुरुस्तीच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर कळवले आहे. तूर्तास चर्च परिसरात पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेकडेही प्रामुख्याने लक्ष दिले जाईल. – कैलास शिंदे (अधीक्षक पुरातत्व विभाग )

वसई किल्ल्याच्या दुरवस्थेबाबत तीन वर्षांपूर्वी पुरातत्व खात्याच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. चित्रपटाचे चित्रीकरण करताना नियम धाब्यावर बसवून किल्ल्याच्या मूळ भिंतींना इजा पोहोचवली जात आहे. या ऐतिहासिक किल्ल्यात कोणत्याही चित्रपटाला चित्रीकरणासाठी कायमस्वरूपी परवानगी देण्यात येऊ नये. किल्ल्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. श्रीदत्त राऊत (किल्ले वसई मोहीम व इतिहास अभ्यासक)