
रेखा जरे खून खटल्यातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्यावरील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करायचे असून, पोलिसांनी आता यापूर्वी जबाब घेतलेल्या पाचजणांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविले आहे. दरम्यान, दुसरीकडे बोठे याने तपासामध्ये दिलेली माहिती योग्य आहे की नाही, याचीही पडताळणी सध्या केली जात आहे.
जरे हत्याकांडामध्ये पोलिसांनी सुरुवातीला पाच आरोपींचे दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले होते. घटनेच्या 100 दिवसांनंतर यातील मुख्य आरोपी बोठे याला पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली होती. त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणारा जनार्दन अकुले यालासुद्धा अटक केली होती. बोठे तीन महिने त्याच्या मित्रामार्फत त्याच्या घरी संपर्कात होता. त्याचा मित्र महेश तनपुरे यालाही पोलिसांनी अटक केली होती.
पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल करताना आधी पकडलेल्या पाच आरोपींचे दोषारोपपत्र दाखल केले होते. आता मुख्य आरोपी बोठे याला पकडल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आता इतरत्र माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्याने दिलेली माहिती खरी आहे की खोटी आहे, याची पडताळणी केली जात आहे. आता हत्याकांड प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करायचे असल्यामुळे आता पोलिसांनी ज्यांचे पूर्वी जबाब घेतल होते, त्यांतील पाचजणांना नोटिसा बजावून जबाबासाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. उद्या त्यांचे जबाब घेतले जाणार आहेत.


























































