
राज्य सरकारकडून सध्या वर्सोवा-विरार सी लिंकचा सर्व्हे सुरू असल्याने येथील मच्छिमारी व्यवसाय उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील मच्छीमारांनी एकत्र येत सी लिंकला कडाडून विरोध केला असून वर्सोवा-विरार सी लिंक कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार कोळी बांधवांनी केला आहे.
वर्सोवा-विरार सी लिंकमुळे वेसावा येथे साडेचारशेहून अधिक मच्छीमार बाधित होणार आहेत. विकासाच्या नावाखाली सी लिंक उभारून सरकारने मासेमारी क्षेत्र हिरावून घेत आहे. त्याला विरोध दर्शवण्यासाठी वेसावे गावातील सर्व संस्था, प्रतिनिधींची सभा वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जयेंद्र लडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड, वेसावा कोळी सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड, वेसावा मच्छीमार नाखवा मंडळ ट्रॉलर आणि वेसावा गावातील पंचायतन संस्था असलेली वेसावा कोळी जमात ट्रस्ट यांनी या सभेचे आयोजन केले होते. यावेळी वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष राजहंस टपके, राजेश्री भानजी, प्रदीप टपके, वेसावा मच्छीमार नाखवा मंडळाचे सेव्रेटरी जयराज चंदी, नाखवा मंडळाचे संस्थापक पृथ्वीराज चंदी, पराग भावे आदी उपस्थित होते.



























































