
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ‘एव्हरग्रीन’ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने वठवल्या होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी-ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, मुले अभिनेता अजिंक्य देव, दिग्दर्शक अभिनय देव असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रावर शोककळा पसरली असून रुबाबदार, शैलीदार, राजबिंडा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्याची हळहळ व्यक्त होत आहे.
रमेश देव यांच्या पार्थिवावर उद्या (गुरुवारी) दुपारी 3 वाजता विलेपार्ले पूर्वेकडील पारसीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जुहू वर्सोवा लिंक रोडवरील ‘रूपरंग’ सोसायटी येथे ठेवण्यात येणार आहे.
हिंदुस्थानी चित्रपट आणि मालिकासृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून रमेश देव यांचे नाव आदराने घेतले जाते. अगदी कृष्णधवल चित्रपटांपासून ते अलीकडच्या जाहिराती आणि वेब माध्यमांपर्यंत सर्व माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. खलनायक रुबाबदार असू शकतो हे त्यांनी दाखवले होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी 285 हिंदी चित्रपट, 190 मराठी चित्रपट, 250 हून अधिक जाहिराती तसेच 30 नाटकांमध्ये काम केले होते. पाटलाचं पोर, सुवासिनी, झेप, अपराध, सर्जा, या सुखांनो या, आनंद, कसौटी, फटाकडी, जय शिवशंकर, तीन बहुरानियाँ हे त्यांचे अनेक गाजलेले चित्रपट. 2006 साली आलेल्या ‘निवडुंग’ या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती. वयाची नव्वदी ओलांडली तरी त्यांचा उत्साह कायम होता. त्यांच्या अचानक जाण्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
रमेश देव यांची चित्रपट कारकीर्द
रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 रोजी कोल्हापूर येथे झाला. देव यांचे आजोबा अभियंता होते. त्यांनी राजस्थानातील जोधपूर पॅलेसच्या उभारणीत मोठे योगदान दिल्याने कोल्हापूर शहराच्या उभारणीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी देव यांच्या आजोबांना निमंत्रित केले. त्यामुळे देव कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झाले. रमेश देव यांचे वडील शाहू महाराजांचे कायदेशीर सल्लागार होते. रमेश देव यांनी चित्रपट कारकीर्दीची सुरुवात ‘राम राम पाव्हणं’ (1950) मधील एका छोटय़ा भूमिकेने केली. त्यानंतर निर्माते राजा परांजपे यांच्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ (1956) मध्ये मुख्य खलनायकाच्या भूमिकेत त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला. ‘आरती’ या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेमात प्रवेश केला. ‘आनंद’ या चित्रपटात डॉक्टरांची भूमिका त्यांनी सुरेख वठवली होती.
शूटिंग बघायला गेले अन् अभिनेता झाले
त्यांचे वडील पृथ्वीराज कपूरचे खूप चाहते असल्याने त्यांनी एकदा पृथ्वीराज कपूरच्या चित्रपटाच्या सेटवर रमेश यांना सोबत नेले होते. शेवटच्या क्षणी एक बालकलाकार आला नाही म्हणून दिग्दर्शक त्यांच्याकडे गेले आणि त्यांना चित्रपटात काम करशील का, असे विचारले. त्यांनी होकार दिला आणि बालकलाकार म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. रमेश देव यांनी ‘पाटलाची पोर’मध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले.
एव्हरग्रीन लव्हस्टोरी…
रमेश देव यांच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी हळहळलीय. वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही ‘एव्हरग्रीन’ आयुष्य जगलेल्या रमेश देव यांचे पत्नी सीमा देव यांच्याशी असलेल्या प्रेमाच्या नात्यात वृद्धत्वातही तोच गोडवा होता. पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ अर्थात अभिनेत्री सीमा देव आणि रमेश देव यांचे 1962 साली लग्न झाले. दोघांनी आपले वैवाहिक आयुष्य सुखनैव जगतानाच अनेक चित्रपटांत सोबत दिली. दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री कायमच चांगली राहिली. त्यांचे एकमेकांवरचे जिवापाड प्रेम चित्रपटसृष्टीतील ‘एव्हरग्रीन लव्हस्टोरी’ म्हणून संस्मरणीय राहणार आहे.
रमेश देव आणि सीमा देव यांच्या वयात 12 वर्षांचा फरक. रमेश देव यांनी 1950 मध्ये मराठी चित्रपटापासून आपल्या करीअरची सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला छोटय़ा भूमिका पडद्यावर साकारल्या. पुढे अल्पावधीतच त्यांना चित्रपटात मुख्य भूमिकाही मिळत गेल्या. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या. हिंदी चित्रपटांतही त्यांच्या अभिनयाला चांगला वाव मिळत होता. याचवेळी दुसरीकडे चित्रपटसृष्टीत नलिनी सराफ हे नाव नावारूपाला येत होते. त्यांनी चित्रपटांसाठी आपले नाव सीमा असे ठेवले होते. सीमा देव यांनी 1960 मध्ये ‘जगाच्या पाठीवर’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटात रमेश देव यांनीसुद्धा भूमिका साकारली होती. या जोडीमुळे ‘जगाच्या पाठीवर’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट ’ब्लॉकबस्टर’ ठरला.
रमेश देव आणि सीमा देव यांचे एकमेकांवर प्रेम जडले ते 1962 मध्ये. या वर्षात प्रदर्शित झालेल्या ‘वरदक्षिणा’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. येथे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी आणखी विलंब न करता त्याच वर्षी लग्न केले. 2013 मध्ये या जोडीच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली. यंदा या जोडीने लग्नाचा 60 वा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव अखेरपर्यंत आपल्या लाडक्या पत्नीसाठी भेटवस्तू घ्यायचे. त्यातून त्यांचे पत्नीवरील निस्सीम प्रेम वेळोवेळी प्रकट व्हायचे.
1967 साली मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा कॅमेरासमोर काम केले आहे. माझ्या आयुष्यातील पहिल्याच चित्रपटातील सीन त्यांच्याबरोबर होता. त्यावेळी ते मराठीतले फार मोठे हीरो होते. त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर चित्रपट म्हणजे काय असते ते कळले होते. मी त्यांना रमेश भय्या असेच म्हणायचो. – अशोक सराफ, अभिनेते
रमेश देव यांच्या निधनाची बातमी ऐकून प्रचंड दुःख झाले, फारच वाईट वाटले. आपल्यातील एक उत्कृष्ट कलावंत आणि उत्कृष्ट माणूस हरपला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील महान व्यक्तिमत्त्व हरपले आहे. ते शेवटपर्यंत काम करीत राहिले. त्यांनी उत्कृष्ट अभिनयातून लोकांवर छाप पाडली. माझ्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. याच प्रेमातून त्यांनी माझ्या ‘चिमणी पाखरं’ चित्रपटात काम करण्यास होकार दिला होता. – महेश कोठारे, अभिनेते
शेकडो हिंदी-मराठी चित्रपटात काम करूनही त्यांनी कधी मोठेपणा दाखवला नाही. ते सेटवर वेळेवर हजर राहायचे. त्यांचे पाठांतर उत्तम होते. सेटवर अनेकदा ते आम्हाला किस्से सांगायचे. त्यामुळे आम्हाला कळायचे की या माणसाचा चित्रपटसृष्टीत किती मोठा अनुभव आहे. इंडस्ट्रीत त्यांच्यासारखी खूप कमी माणसं पाहायला मिळतात. – अलका कुबल, अभिनेत्री
सदाबहार आणि मनस्वी अभिनेता गमावला! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण आज गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा परवाच वाढदिवस होता. शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच त्यांचे आपल्यातून जाणे दुःखदायक आहे. रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. दोन्हीकडे आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहबंध होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती. चित्रपटसृष्टीत त्यांना आदराचे स्थान होते. त्यांनी एक उत्तम कलावंत म्हणून आयुष्यभर कलाक्षेत्राची सेवा केली. देव कुटुंबीयांकडून कला क्षेत्राची अविरत सेवा सुरू आहे. दिवंगत रमेश देव हे कला क्षेत्रात दोन पिढय़ांना जोडणारा महत्त्वाचा आणि मार्गदर्शक असा दुवा होते. त्यांनी सदाबहार आणि मनस्वी कलाकार अशी प्रतिमा आयुष्यभर जपली. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही असे आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!






























































