‘अश्वत्थामा’ लिहिणारी चिरंजीव लेखणी

168

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक अशोक समेळ.. अश्वत्थामावरील मैलाचा दगड असलेली कादंबरी, आत्मचरित्र आणि असंख्य नाटकं… हे सारं वैभव त्यांना त्यांच्या वास्तूने बहाल केलं…

आयुष्य फक्त हसण्यासाठी आहे. हसतो तो प्रत्येक क्षण आपला.’ असं आयुष्यावर प्रेम करणारे अशोक समेळ. २१ व्यावसायिक, नऊ प्रायोगिक मराठी नाटकं, २७ गुजराती व्यावसायिक नाटकं, दूरवाहिनीसाठी दोन हजारपेक्षा अधिक भागांचं लेखन आणि सहा चित्रपट कथा लिहिणारे, अशोक समेळ. सावरकर पुरस्कार, मामा वरेरकर पुरस्कार, नाटय़दर्पण पुरस्कार, जयवंत दळवी पुरस्कार, राज्य शासनाचा पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, साहित्य परिषद पुणे पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद पुरस्कार, असे अनेकविध पुरस्कार लाभलेले अशोक समेळ. ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’, या तीन वर्षांत पाचवी आवृत्ती निघालेल्या, सातशे पानी कादंबरीचे आणि ‘स्वगत’ या आत्मचरित्राचे लेखक अशोक समेळ. यांच्या ठाण्यातल्या घरी मी जेव्हा गेले, तेव्हा ‘तुमचा आभाळ उंचीचा लेखन प्रवास, जमिनीवर बसून ऐकायचा आहे मला.’ असं म्हणत मी जमिनीवर बसले, तेव्हा तितक्याच सहजतेनं तेसुद्धा जमिनीवर बसून माझ्याशी संवादत राहिले.

जन्म अलिबागला झाला तरी गिरगावातल्या खेतवाडीत, सातव्या गल्लीत, दहा बाय दहाच्या खोलीत, २७ जणांच्या कुटुंबात वाढलो मी. आपापली कामं उरकून संध्याकाळी घरातले सगळे एकत्र बसायचे. आई गाणी गायची, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळेंची. वडील व्हॉयलिन वाजवायचे, काका पेटी वाजवायचे. एक वेगळंच विश्व होतं तिथे. रात्री झोपताना काका गोष्टी सांगायचे, रामायण-महाभारतातल्या. वाचन खूप होतं त्यांचं. खरंतर घराच्या आजूबाजूचं वातावरण विचित्र होतं. पुठे जुगार चाललाय, दारूच्या बाटल्या घेऊन मंडळी बसली आहेत, गांजा पीत आहेत. पण घरात सांस्कृतिक वारसा होता. त्यातूनच मी घडलो. वयाच्या दहाव्या वर्षीच अश्वथामा डोक्यात घर करून बसला. अशा या वातावरणात इंटरपर्यंत अभ्यास केला. घरात गर्दी असायची, त्यामुळे परीक्षा जवळ आली की स का पाटील उद्यानात अभ्यासाला जायचो. युनियन हायस्कूल शाळा माझी. त्या शाळेची परंपरा महान. प्रभाकर पणशीकर, वामनराव पै, सुरेश खरे, लक्ष्मीकांत बेर्डे, अरुण नलावडे, सगळे याच शाळेतले. घराशेजारी असणाऱया सामान्यांमध्ये असामान्यत्व हेरत होतो मी. रात्री दारूची भट्टी लावणारा देवराम, जेव्हा मी मॅट्रिकची परीक्षा पास झालो, तेव्हा सगळ्यांना पेढे वाटत होता. त्यानं जेव्हा मला विचारलं की ’काय देऊ रे तुला’? तेव्हा डोळ्यात पाणी आलं माझ्या.

मी लहान असताना एकदा जुगार खेळायला बसलो होतो, तेव्हा नाम्या दादानं कानफटात मारून जुगार खेळायचा नाही हे हक्काने सांगितलं होतं. तो स्वत: दारुडा होता, पण माझ्यावर मात्र त्यांनं चांगलाच संस्कार केला. नकळत झालेले संस्कार होते ते. मला क्रिकेटची खूप आवड. उत्तम क्रिकेट खेळायचो मी. त्याच बळावर नंतर रुपारेल का@लेजमध्ये अर्ध्या फी वर मला अॅडमिशन मिळाली. तिथे जोग सरांसारखे मराठीचे प्राध्यापक भेटले, ज्यांच्यामुळे माझ्यातल्या लेखकाची मला जाणीव झाली. माझ्या निबंधाला वीसपैकी 21 मार्क द्यावेसे वाटतात, पण देऊ शकत नाही, असं कौतुक सरांनी केलं होतं माझं. गिरगावातून नंतर गव्हर्मेंट कॉलनीत राहायला गेलो. दुरितांचे तिमिर जावो अश्रूंची झाली फुले वगैरेसारखी नाटकं, दीपक खेडकर, इर्शाद हाश्मी अशा मित्रांसोबत अभियान नावाची संस्था काढून, त्या मार्फत केली. तोपर्यंत लिखाणाचा आणि माझा फारसा संबंध आला नव्हता. वडाळ्याला शिफ्ट झालो. तेव्हा रत्नाकर मतकरींचं ’खेकडा’ वाचलं. त्यावर परवानगी घेऊन एकांकिका लिहिली. उत्तेजनार्थ बक्षीसं वगैरेही मिळाली तिला. पण खऱया अर्थानं माझ्या लेखनाला सुरुवात झाली, ती प्रभाकर पणशीकरांकडे काम करत असताना. पुत्रकामेष्टीमध्ये काम करत होतो.

आम्ही चेंबूरला शिफ्ट झालो होतो. त्या बिल्डींगमधले ५ फ्लॅट्स आमचे होते. वडिलांची इच्छा अशी होती की प्रत्येकानं भले स्वतंत्र संसार थाटला, तरी सणावाराला सगळ्यांनी एकत्र यायलाच हवं.. म्हणून ही सोय होती. माणसं जोडून ठेवण्याचा हा संस्कारसुद्धा खूप महत्त्वाचा वाटतो मला. या चेंबूरच्या घरातच मी १९८० साली डोंगर म्हातारा झाला या कादंबरीवरून नाटक लिहायला घेतलं. तेव्हा नाटक कसं लिहायचं याचं एबीसीडीसुद्धा मला माहित नव्हतं.

मग मला व्यसनच लागलं लिहिण्याचं. अनिल बर्वेंच्या सगळ्या कादंबऱयांचे हक्क मी घेतले. ११ कोटी गॅलन पाणी, युद्धविराम, होरपळ, अशी सगळी नाटकं राज्य नाटय़ स्पर्धांना लिहून दिली आणि प्रत्येक नाटकाला बक्षीस मिळत गेलं. एकदा हातात राजा रविवर्मा ही रणजित देसाईंची कादंबरी हातात पडली. त्यावरून मला नाटक लिहायचं होतं.’ नाटक लिहून आण मग परवानगी देतो’ असं रणजित देसाई म्हणाले आणि जेव्हा हे नाटक मी त्यांच्या समोर वाचलं, तेव्हा काही प्रवेश ऐकून ते अक्षरश रडले. डोंगर म्हातारानंतर हिचकॉकच्या सायकोवरून पिंजरा लिहिलं.

अशोक समेळ यांच्याकडून त्यांच्या लिखाणासाठी त्यांनी घेतलेली मेहनत मी ऐकत होते. एखादं पात्र रंगवताना लेखक म्हणून ते परकाया प्रवेश कसा करतात आणि मग त्या पात्राची भाषा, लेखक अशोक समेळ यांची न राहता, त्या पात्राची बनून संवाद रुपात कशी येते, याचं विश्लेषण ते करत होते. या त्यांच्या अभ्यासामुळेच ते नाटकातल्या त्यांच्या पात्रांना जिवंत करतात आणि म्हणूनच ती पात्रं प्रेक्षकांना सच्ची वाटतात. त्यांच्या लिखाणाचा हेच यश आहे. लेखन प्रवासातला संघर्ष, त्यांच्या आयुष्यातही त्यांची सोबत करत होता. ‘शपथ तुला जिवलगा’ या नाटकाच्या प्रयोगाच्या दरम्यान त्यांच्या नाटकाचे सेटस जळाले. चार लाखांचं नुकसान झालं.. पण ते खचले नाहीत की थकले नाहीत. ‘फाईट’ हा शब्द त्यांच्या आयुष्याचा गर्भितार्थ आहे ,हे ते कधीही विसरले नाहीत. ‘स्वगत’ या त्यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना, त्यांच्या मुलानं, संग्रामनं लिहिली आहे, त्यातही त्यांच्या ’फाईट’ या वृत्तीबद्दल त्यानं आवर्जून लिहिलं आहे.’ दु:ख ही त्यांची लढण्याची ताकद आहे, अपयश हे त्यांचं शस्त्र आहे आणि प्रेक्षकांची, वाचकांची दाद हे त्यांचं चिलखत आहे’ अशा शब्दात, राखेतून वाऱयाच्या वेगानं झेपावणाऱया फीनिक्स पक्षाची उपमा संग्रामनं त्याच्या बाबाला दिली आहे.

अशोक समेळ त्यांची संघर्ष गाथा सांगताना पुढे म्हणाले, १९८८ साली सेट जळाले, माझ्या मुर्खपणामुळे चेंबूरची जागासुद्धा सुटली आणि आम्ही ठाण्याला राहायला आलो. काम शोधत होतो. नाटक नाही, काम नाही, अशा परिस्थितीत रमेश उदारेनं विनिता ऐनापुरे यांची एक कादंबरी मला वाचायला दिली. त्याच्यावरून मी पुसुम मनोहर लेले लिहिलं. अर्थात नाटकासाठी लागणारा संघर्ष, नाटय़मयता यासाठी कादंबरीत नसणारी दोन पात्र मी आणली आणि हे नाटक प्रचंड गाजलं. मग पुन्हा एकदा माझ्या लिखाणानं वेग पकडला. अनेक मराठी, गुजराती नाटकं, मालिका, चित्रपट, अभिनय, दिग्दर्शन अशा सर्वच क्षेत्रात मी काम करत राहिलो.. मालिकांमुळे माझा पोटापाण्याचा प्रश्न सुटला. सस्पेंस स्टोरीज तर मी खिशातून काढून लिहितो. तिसरा डोळा मी अशीच लिहिली.

माझ्या अनेक नाटकांचे शेकडो प्रयोगही झाले. गुजराती नाटक मला पैसे देत होती आणि तो पैसा मी मराठी नाटकात वापरत होतो. नाटक माझा श्वास आहे. त्या शिवाय मी जगू शकत नाही. वयाच्या दहाव्या वर्षापासून जो अश्वत्थामा माझ्या डोक्यात होता त्याला कागदावर उतरवायचा नंतर मी ध्यास घेतला. महाभारताचे १८ खंड, जे प्रत्येकी १००० पानांपेक्षा जास्त आहेत, ते वाचले, अभ्यासले, नोट्स काढल्या, अनेक संदर्भ ग्रंथ वाचले, रमेश उदारेनं मला अश्वत्थामाचं स्थान दाखवलं. नंदुरबारजवळ सातपुडामधला अस्तंभा. जिथे यात्रा भरते. लाखो भक्त येतात. अश्वत्थामा चिरंजीव आहे. त्याला तिथले लोक देव मानतात. कादंबरीला २१ वर्षांच्या रिसर्च नंतर मूर्त स्वरूप आलं. मग पंचाहत्तरीच्या निमित्तानं प्रकाशक मागे लागले, आत्मचरित्र लिहा. मी म्हणालो की मी सामान्य माणूस आहे. माझं कसलं आत्मचरित्र? माझ्यातल्या सामान्य माणसाचं आत्मचरित्र मी लिहू शकेन फार तर, असं सांगून मी ते लिहिलं. एक महिन्यात पूर्ण केली मी ४५० पानं हातानं लिहून. कारण मला टायपिंग करता येत नाही.

अश्वत्थामा लिहायला सुरुवात करताना, माझ्या बायकोनं संजीवनीनं, सरस्वतीची मूर्ती, उदबत्ती लावून टेबलवर आणून ठेवली होती. १० ते १२ तास सतत लिहायचो तेव्हा, पण तिनं मला कधीही डिस्टर्ब केलं नाही. घरातल्या माणसांचा असा सपोर्ट अत्यंत गरजेचा असतो हे मात्र मी निश्चितपणे सांगेन. कादंबरीच्या लेखनातून पैसे मिळत नाहीत हे खरं असलं, तरी वाचनानं माणूस श्रीमंत होतो. म्हणून वाचकांना श्रीमंत करायला मी कादंबरी लिहिली आहे. टीव्हीच्या धकाधकीच्या जीवनात, बंद झालेलं वाचन सुरू व्हायला हवं, असं मला वाटतं. पूर्वी मी स्टॉप पर्यंत चालत जायचो तेव्हाही वाचत जायचो. आता गाडीतून जातो, तेव्हाही वाचतोच…माझा खूप अभ्यास असतो लिखाणापूर्वी आणि एकदा एका प्रकारचं लिहिलं की तसंच दुसरं मी लिहीत नाही. अश्वत्थामानंतर दुर्येधनावर लिहायला सांगितलं गेलं मला, तेव्हा नकार दिला मी. कारण मला तोचतोचपणा नको असतो’.

अनेक चढ-उतारांनी परिपूर्ण आयुष्याला, सखोल विचारांनी सामोरं जाणारे अशोक समेळ, ज्या उत्साहानं बोलत आणि वावरत होते, तो उत्साह ऊर्जा स्वरूपात, झिरपत गेला माझ्यात. जो माझ्या राहून गेलेल्या अपूर्ण गोष्टींना, पूर्णत्वाला नेण्यासाठी निश्चितच प्रेरणा देऊन गेला. गेलं त्याचा शोक करता संकटाना सामोरं जाण्याची, हार न मानता संग्राम करण्याची आणि नवनवोन्मेशाची पल्लवी जागृत ठेवून, जगण्याची संजीवनी देणारी ही मुलाखत, खरंच अविस्मरणीय अशीच होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या