हिंदुस्थानच्या खासगी अंतराळ क्षेत्राची मोठी झेप; स्कायरूटच्या ‘विक्रम-1’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने खासगी अंतराळ क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा गाठत स्कायरूट एरोस्पेसने शुक्रवारी ‘विक्रम-1’ या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सकाळी सुमारे 11.30 वाजता हे प्रक्षेपण करण्यात आले. हिंदुस्थानच्या खासगी क्षेत्रातील पहिल्या ऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मोहिमेमुळे देशासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

‘आगमन’ असे या मोहिमेला नाव देण्यात आले असून रॉकेटने नियोजित वेळेनुसार सर्व टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले. त्यानंतर उपग्रहाला नियोजित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करण्यात आले. या संपूर्ण मोहिमेवर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी बारकाईने लक्ष ठेवले.

हे प्रक्षेपण केवळ स्कायरूट एरोस्पेससाठीच नव्हे तर, हिंदुस्थानच्या संपूर्ण खासगी अंतराळ उद्योगासाठी मोठे पाऊल मानले जात आहे. 2020 मध्ये केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्रात मोठ्या सुधारणा करत खासगी कंपन्यांना रॉकेट, उपग्रह आणि प्रक्षेपण सेवा विकसित करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर हिंदुस्थानच्या खासगी कंपन्यांसाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या.

यापूर्वी स्कायरूट एरोस्पेसने 2022 मध्ये ‘विक्रम-एस’ हे सब-ऑर्बिटल रॉकेट यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले होते. मात्र, त्या मोहिमेत कोणताही उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आला नव्हता. यावेळी विक्रम-1 रॉकेटद्वारे विविध ग्राहकांचे लहान उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 450 किलोमीटर उंचीवरील लो-अर्थ ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आले. ही तीन विकासात्मक मोहिमांपैकी पहिली मोहीम असून त्यानंतर हे रॉकेट नियमित व्यावसायिक प्रक्षेपणासाठी तयार केले जाणार आहे.

ऑर्बिटल रॉकेट का महत्त्वाचे?

सब-ऑर्बिटल आणि ऑर्बिटल रॉकेटमध्ये मोठा फरक असतो. सब-ऑर्बिटल रॉकेट अंतराळाच्या सीमेला जाऊन पुन्हा पृथ्वीवर परत येते. मात्र, ऑर्बिटल रॉकेट उपग्रहाला इतका वेग देते की तो पृथ्वीच्या कक्षेत सतत फिरत राहतो. विक्रम-1 च्या यशामुळे प्रथमच एखाद्या भारतीय खासगी कंपनीच्या रॉकेटने ही कामगिरी साध्य केली आहे.

विक्रम-1 रॉकेटची वैशिष्ट्ये

विक्रम-1 हे चार टप्प्यांचे रॉकेट आहे. त्यातील पहिले तीन टप्पे घन इंधनावर आधारित आहेत तर, चौथ्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर चालणारे इंजिन बसवण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार हे इंजिन पुन्हा सुरू करता येते. त्यामुळे उपग्रहाला त्याच्या अचूक कक्षेत अधिक नेमकेपणाने स्थापित करता येते. हे रॉकेट विशेषतः लहान उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी विकसित करण्यात आले आहे.

स्कायरूट एरोस्पेसची सुरुवात

स्कायरूट एरोस्पेसची स्थापना 2018 मध्ये इस्रोचे माजी अभियंते पवन कुमार चंदाना आणि नागा भरत डाका यांनी केली होती. 2020 मध्ये खासगी क्षेत्रासाठी अंतराळ उद्योग खुला झाल्यानंतर कंपनीने ऑर्बिटल रॉकेट विकसित करण्याच्या दिशेने वेगाने काम सुरू केले. ‘विक्रम-1’चे यश हे त्या प्रवासातील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जात आहे.

या मोहिमेच्या यशामुळे भारताच्या खासगी अंतराळ उद्योगाला मोठी चालना मिळणार असून भविष्यात देशातून अधिक व्यावसायिक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे या मोहिमेकडे देशासह जागतिक अंतराळ उद्योगाचेही लक्ष लागले होते.