
सामना ऑनलाईन । नांदेड
माजी मंत्री व काँग्रेसचे आमदार डी. पी.सावंत यांच्या स्वीय सहायकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. किरण तांदळे असे मारहाण झालेल्या स्वीय सहायकाचे नाव आहे. यावेळी आमदार सावंत यांना देखील धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. मतदार संघातील तळणी गावात विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमावेळी गावकरी आणि किरण तांदळे यांच्यात शाब्दीक चकमक झाली आणि नंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.
नांदेड तालुक्यातील तळणी गावात शनिवारी रस्त्याचे भूमिपूजन व युवक काँग्रेसच्या शाखेच्या नामफलकाच्या अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माजी शिक्षण राज्य मंत्री डी. पी.सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी गावात दाखल झाले होते. यावेळी गावातील काही नागरिकांनी निडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतांचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. यावेळी सावंत यांचे स्वीय सहायक तांदळे यांनी अरेरावी करत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शाब्दिक चकमक झाली. यावेळी तांदळे यांना नागरिकांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे गावातील विकास कामांचे उदघाटन न करताच आमदार व काँग्रेस पदाधिकारी यांना माघारी फिरावे लागले.



























































