मगर आणि गावकऱ्यांची अशीही मैत्री , गावकरी उभारणार मगरीचे मंदिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रायपूर

एरवी कुठे मानवी वस्तीत मगर दिसली की पळापळ होते, वनविभागाला पाचारण करून लवकरात लवकर मगरीचा बंदोबस्त करण्यासाठी हालचाली सुरू होतात. मात्र छत्तीसगडमधील एका गावावर तेथील मगरीच्या मृत्युने शोककळा पसरली आहे. ‘गंगाराम’ असे या मगरचे नाव असून ती नर जातीची मगर होती. गंगाराम आणि गावकऱ्यांचे गेल्या 100 पेक्षा जास्त वर्षांचे मैत्रीचे एक अनोखे नाते तयार झाले होते. मैत्रीचे प्रतीक ठरलेल्या ‘गंगाराम’चे मंदिर उभारण्याचे गावकऱ्यांनी ठरवले आहे.

छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील बावा मोहतरा गावातील तलावात गंगारामचे वास्तव्य होते. मात्र या तलावात मुलं गंगारामच्या जवळ पोहायचे, तसेच महिला कपडे धुण्यासाठी गेल्या तरी या मगरीपासून कोणाला काहीच इजा झाली नव्हती. एखाद्या पाळीव प्राण्याबरोबर मैत्री व्हावी, तशी गावकरी आणि गंगाराममध्ये मैत्री झाली होती. मंगळवारी मात्र गावकऱ्यांना गंगाराम पाण्यावर निपचित तरंगताना दिसला. गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. गंगारामच्या मृत्युची वार्ता गावात कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळवली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मगरीचे शवविच्छेदन केले.

गंगाराम या मगरीचे वजन 250 किलो होते, तर लांबी 3.40 मीटर होती आणि वय साधारण 130 वर्ष होते. त्यामुळे या मगरीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. कायदेशीर बाबी पूर्ण करून व मगरीबद्दल गावकऱ्यांच्या मनात असलेल्या भावनांचा विचार करून वनविभागाने मगरीचा मृतदेह गावकऱ्यांच्या स्वाधीन केला. गावकऱ्यांनी मगरीची अंत्ययात्रा काढून तलावाच्या किनाऱ्यावर विधिवत दफन केले. मगरीच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते. गंगारामच्या मृत्युमुळे शोकसागरात बुडालेल्या बावा मोहतरा गावात त्या दिवशी एकही चूल पेटली नाही. गंगारामची आठवण कायम रहावी म्हणून त्याचे मंदिर बांधणार असून लवकरच स्मारक देखील उभारणार असल्याचे गावाचे सरपंच मोहन साहू यांनी सांगितले आहे.