
टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीची सध्या जगभरातील खेळपट्ट्यांवर हवा आहे. गेल्या एक ते दीड वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांनी जास्त विकेट्स घेतल्या आहेत. इशांत शर्मा, जयप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी या गोलंदाजांनी हिंदुस्थानी संघाला अनेकदा विजयाचे कवाडे उघडून दिले आहेत. टीम इंडियाचा कर्णधारही आपल्या या धारधार गोलंदाजांची प्रशंसा करताना थकत नाही.
वॉर्नर म्हणतो, लाराचा 400 धावांचा विक्रम ‘हा’ हिंदुस्थानी फलंदाज मोडेल!
नुकत्याच बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतही वेगवान गोलंदाजांच्या आक्रमणापुढे पाहुणा संघ ढेपाळला. कोणत्याही संघाच्या फलंदाजीला सुरुंग लावण्याची क्षमता असणाऱ्या गोलंदाजांच्या ताफ्याबाबत विराट कौतुकाचे गोडवे गात असतो. परंतु हे क्षण अनुभवण्यासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागली, असा खुलासा विराटने केला.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत विराटने अनेक खुलासे केले. तसेच गोलंदाजांच्या आपापसातील मैत्रीचे आणि ड्रेसिंगरुमधील मजेशीर किस्सेही विराटने सांगितले. विराट म्हणतो, ‘त्या सर्वांमध्ये एक वेगळेच नाते आहे आणि ते सर्व मिळून मिसळून राहतात. मी तुम्हाला जास्त खोलात जाऊन सांगू शकत नाही मात्र आजकाल ज्या कॉमेडी मूव्ही येतात त्यासोबत तुम्ही याची तुलना करू शकता. त्यांना पाहून तुम्ही हसने रोखू शकणार नाही. हे क्षण शानदार आहेत.’ तसेच इशांत शर्मा सिनीअर असला तरी सर्वात जास्त खिल्ली त्याचीच उडवली जाते. जस्सी (बुमराह) लाजाळू पण हजरजबाबी आहे. भुवी एकदम यूपीवाला आहे, मजा-मस्ती करणारा. शमी आणि उमेशही सर्वांमध्ये मिसळून जातात, असेही तो म्हणाला.

तेव्हा फक्त झहीरवर होता विश्वास
विराट पुढे म्हणतो, टीम इंडियाचे सध्याचे वेगवान आक्रमण खतरनाक आहे, कारण ते मिळून विरोधी संघावर हल्ला चढवतात आणि दबाव वाढवतात. याआधी असे होत नव्हते. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर गेल्या दशकामध्ये झहीर खान सोडून अन्य वेगवान गोलंदाजावर विश्वास ठेवला जात नव्हता. त्यावेळी इशांत शर्मा देखील होता, परंतु आता जसा आहे तसा नव्हता.

तसेच नवीन चेंडूने इशांत सुरुवात करतो आणि त्यानंतर उमेश व शमीचा नंबर लागतो. स्लिपमध्ये उभे असणारे खेळाडू तर शमीचा स्पेल कधी सुरु होतो याकडे लक्ष देऊन असतात. कारण कोणत्याही पिचवर कमाल करण्याची त्याची क्षमता वाखनण्याजोगी आहे.

























































