विराटच्या जागी रोहित शर्मा? टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा

90
virat-rohil-captain

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र सेमिफायनमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांची घोर निराशा झाली. या आश्चर्यकारक पराभवानंतर बीसीसीआय आता कारवाईच्या तयारीत आहे.

बीसीसीआय आता संघात मोठे बदल करण्याची शक्यता आहे. यामध्ये कर्णधारपद विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे येण्याची शक्यता आहे. वन-डे आणि टी-20 चे कर्णधार पद रोहितकडे येण्याची शक्यता आहे. तर विराटला केवळ कसोटी संघाचा कर्णधार करण्यात येईल असे देखील सांगितले जात आहे.

असे झाल्यास टीम इंडियात आणखी काही मोठे बदल पाहायला मिळतील अशी चर्चा रंगली आहे. टीम इंडियाला अधिक मजबूत करण्यासाठी म्हणून बदलाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिल्याचे खासगी वृत्तवाहिनीच्या बातमीत म्हटलं आहे.

वन डे सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा सक्षम असून त्याने ही जबाबदारी स्वीकारावी. तसेच यासाठी सध्याच्या कर्णधार (विराट कोहली) आणि संघ व्यवस्थापनाने देखील ही गोष्ट मान्य करावी, असे ही या अधिकाऱ्याने म्हटल्याचे या बातमीत म्हटले आहे. असं असलं तरी संघात कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात कोणताही मतभेद नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेले COA चे प्रमुख विनोद राय यांनी देखील म्हटलं आहे की, लवकरच समीक्षा बैठक बोलवण्यात येईल. यामध्ये रवि शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि मुख्य निवड अधिकारी एमएसके प्रसाद देखील उपस्थित असतील.

आपली प्रतिक्रिया द्या