
सामना प्रतिनिधी । मुंबई
फोल्क्सवॅगनच्या ऍमीओ चषक कार रेसिंग स्पर्धेला मोटारस्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया महासंघाने (एफएमएससीआय) राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचा दर्जा देण्यात आला आहे. फोल्क्सवॅगन मोटारस्पोर्टस् इंडिया 2010 पासून स्वतःची कार रेसिंग स्पर्धा भरवत आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ऍमीओ चषक मोटर रेस मालिकेचे आयोजन सुरू केले होते. आता राष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा मिळाल्याने ही स्पर्धा अधिकच रंगतदार होणार आहे. फोल्क्सवॅगन मोटारस्पोर्टस् इंडिया ऍमीओ चषक रेसची पहिली फेरी कोइम्बतूरच्या कारी मोटार स्पीडवेवर तर दुसरी आणि तिसरी फेरी चेन्नईच्या मद्रास मोटार रेसिंग ट्रकवर पार पडणार आहे. अंतिम फेरी नोयडाच्या फॉर्म्युला वन बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर आयोजित केली जाणार आहे. या रेसच्या जुनिअर आणि व्यावसायिक विजेत्या ड्रायव्हर्सना आता राष्ट्रीय विजेते गणले जाणार आहे.




























































