सीप्झ जंक्शनला पुन्हा जलवाहिनी फुटली; अंधेरी, विलेपार्ल्याच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम

अंधेरी पूर्व एमआयडीसी सीप्झ जंक्शन येथे वेरावली जलाशय क्रमांक 3 ची 1800 मिमी व्यासाची जलवाहिनी आज सकाळी फुटली. यामुळे अंधेरी पश्चिम व विलेपार्ले पश्चिम भागातील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला. दरम्यान, दुपारी जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली. मात्र हे सेवा जलाशय असल्यामुळे ते भरण्यासाठी वेळ लागल्याने अंधेरी, विलेपार्ल्यातील काही भागांत संध्याकाळीही पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. उद्या, शुक्रवार सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी मेट्रोच्या कामावेळी याच ठिकाणी जलवाहिनी फुटल्यामुळे अनेक दिवसांसाठी सहा विभागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.

जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी वेरावली-3 जलाशयाचे इनलेट बंद करावे लागले होते. दुरुस्तीमुळे काही भागांमध्ये पाण्याच्या कमी दाबामुळे नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा झाला नसल्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय झाली.

वांद्रे येथे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा
महापालिकेच्या एच विभागातील पाली हिल जलाशयांच्या मुख्य जलवाहिनीवर 600 मिलीमीटर व्यासाची झडप बसवण्याचे काम शुक्रवार, 16 आणि शनिवार, 17 फेब्रुवारीला केले जाणार आहे. त्यामुळे पाली गाव, नवी कांतवाडी, शेरली राजन, च्युईंम गाव, पाली पठार झोपडपट्टी, डॉ. आंबेडकर मार्गाजवळच्या झोपडपट्टय़ा, गजधरबंद भाग, दांडपाडा त्याचबरोबर 16 वा रस्ता आणि 21 वा रस्ता यांच्यातील खार पश्चिमेच्या भागात दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती जल अभियंता विभागाने दिली.