नगरमध्ये 11 तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

सध्या जिल्हयात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हयात विविध ठिकाणी टँकरची मागणी वाढत आहे. मात्र, काही ठिकाणी निधीअभावी टँकर मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे. यावर आता प्रशासनाने नियोजन करण्यास सुरवात केली असून दुष्काळ व इतर प्रश्‍नांवर आराखडा तयार केला असुन सरकारकडे पाठवला आहे. यंदा जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 290 गावे व एक हजार 499 वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये अकोले, श्रीरामपूर व नेवासा वगळता सर्वच तालुक्यांमध्ये सध्या टँकर सुरू आहेत.

यंदा पावसाने दडी दिल्याने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. टंचाईग्रस्त गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तरी सुटावा, यासाठी टँकरची मागणी वाढत आहे. जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत. या तालुक्यातील तब्बल 86 गावे व 534 वाड्यावस्त्यांवरील दोन लाख 28 हजार 812 लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या पाथर्डीमध्ये 118 टँकर सुरू करण्यात आले आहे. राहुरी तालुक्यामध्येही दोन गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. भंडारदरा व निळवंडे धरण असलेल्या अकोले तालुक्यामध्ये अद्याप एकही टँकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली नाही. मात्र, जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहुरी, राहता, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड व श्रीगोंदे या अकरा तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील मुळा व निळवंडे या दोन प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा 30 टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. मुळा धरणामध्ये चार हजार 835 दशलक्ष घनफूट (22 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. 8 हजार 320 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या निळवंडे धरणामध्ये 2 हजार 364 दशलक्ष घनफूट (29 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.