
>> स्पायडरमॅन
सोशल मीडियाच्या जगतात सध्या डॉ. अक्षता कृष्णमूर्ती हे हिंदुस्थानी नाव चांगलेच चर्चेत आहे. नासामध्ये कार्यरत असलेल्या डॉ. अक्षता कृष्णमूर्ती मंगळावर रोव्हर चालवणारी (संचलन करणारी) पहिल्या हिंदुस्थानी महिला बनल्या आहेत. हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे अक्षता सांगते. ती नासाच्या मंगळ मोहिमेशी जोडली गेली तेव्हा अनेक स्वप्ने तिने बघितली होती. या मोहिमेच्या माध्यमातून नासाचे शास्त्रज्ञ मंगळावरील काही नमुने मिळवून त्यांचा प्रयोगशाळेत अभ्यास करण्यासाठी उत्सुक आहेत. याच मोहिमेसाठी अक्षताने नुकतेच मंगळावर रोव्हर चालवण्याचे कार्य केले. रोव्हरने गोळा केलेले नमुने लवकरच पृथ्वीवर आणले जाणार आहेत. मस्कत इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पीएचडी पूर्ण केल्यानंतर अक्षताची नासामध्ये निवड झाली. नासामध्ये कामाचे स्वप्न पूर्ण करताना बऱयाच अडचणींना अक्षताला सामोरे जावे लागले. जमिनीवर आणि अवकाशात चालणाऱया विविध प्रयोगांमध्ये आणि रोबोटिक ऑपरेशन्समध्ये सहभागी होण्यासाठी मी धडपडत होते. मात्र मला नासामध्ये प्रवेश मिळणे अवघड असल्याचे अनेकांचे मत होते. मी एकतर ‘प्लॅन बी’ तयार ठेवावा किंवा माझे कार्यक्षेत्र बदलावे असेदेखील काही लोकांनी सुचवले. मात्र माझा स्वतःवर पूर्ण विश्वास होता, असे अक्षताने सांगितले. मी आता ज्या स्थानावर आहे, त्या स्थानावर पोहोचणे हे जगभरातील लाखो लोकांचे स्वप्न आहे हे मी जाणते. या ठिकाणी पोहोचण्यासाठी कष्ट, दृढनिश्चय आणि धैर्य माझ्यासाठी महत्त्वाचे ठरले असेदेखील ती आवर्जून सांगते. हिंदुस्थानी वंशाच्या, पण अमेरिकन नागरिक असलेल्या सुनीता विल्यम्स या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सहा महिने राहून विक्रम करणाऱया पहिल्या महिला होत्या. त्यांनी 9 डिसेंबर 2006 ते 22 जून 2007 या कालावधीत 29 तास 17 मिनिटांचे चार अंतराळ वॉक केले होते, तर 1997 मध्ये हिंदुस्थानच्या कल्पना चावला यांनी नासाच्या कोलंबिया स्पेस शटलमध्ये 15 दिवस आणि 16 तास अंतराळात घालवले होते.




























































