
पेट्रोलियम पदार्थांच्या मदतीने उत्पादन केलेले प्लॅस्टिक सामान्यतः सर्वत्र पॅकेजिंगसाठी वापरण्यात येते. वजनाने हलके, मजबूत, पारदर्शक आणि अत्यंत कमी किमतीत तयार होत असल्याने हे प्लॅस्टिक अत्यंत लोकप्रियदेखील आहे आणि त्यामुळेच त्याचा अनिर्बंध असा वापरदेखील होत आहे. तथापि, अशा प्रकारचे प्लॅस्टिक सहजपणे नष्ट होत नसल्याने पृथ्वीवर मोठय़ा प्रमाणात त्याचा घन कचरा जमा होत राहतो. त्यामुळे हे प्लॅस्टिक म्हणजे स्वतःच एक गंभीर समस्या बनून राहिले आहे. अशा प्रकारच्या प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाला प्रचंड मोठा असा धोका निर्माण होत असतो.
महानगरपालिकेने गोळा केलेल्या एकूण घन कचऱयामध्ये 12 टक्के हे निव्वळ प्लॅस्टिक असते, यावरून या समस्येचे गांभीर्य आपल्या लक्षात येईल. हा कचरा जाळल्यानंतर पारा, पॉलिक्लोरिनेटेड बायफेनिल्स, फ्युरन्स, डायऑक्सिन असे विविध विषारी वायू वातावरणात सोडले जातात. मात्र आता हिंदुस्थानी शास्त्र्ाज्ञांनी या समस्येवर उपाय शोधला असून शास्त्र्ाज्ञांच्या या टीमने पर्यावरणपूरक आणि जैवविघटनशील असे प्लॅस्टिक बनविण्यात यश मिळवले आहे. या प्लॅस्टिकचा वापर पॅकेजिंगसाठी सहजपणे करता येऊ शकतो. शास्त्र्ाज्ञांनी गवारीच्या शेंगा आणि कायटोसन वापरून हे पर्यावरणपूरक प्लॅस्टिक बनवले आहे. गवारीच्या शेंगा, कायटोसन, झिंगा आणि खेकडय़ांपासून मिळवलेले पॉलिकेसेराईड यांच्या मदतीने हे प्लॅस्टिक तयार करण्यात आले आहे. पॉलिकेसेराईडपासून बनवण्यात आलेल्या पॅकेजिंग मटेरियलला कायमच उच्च दर्जाचे पर्यावरणपूरक उत्पादन म्हणून ओळखले जाते. या प्लॅस्टिकची पाणी सहन करण्याची शक्ती अद्भुत असून त्याला पाण्यापासून कोणताही धोका उत्पन्न होत नाही. शास्त्र्ाज्ञांनी गवारीच्या शेंगांपासून बनवलेला डिंक आणि कायटोसनच्या मिश्रणापासून एक पातळ आवरण (फिल्म) तयार केले. हे आवरण 240 तासानंतरदेखील पाण्यात विरघळले नाही हे महत्त्वाचे. या बायोपॉलिमर कम्पोझिट फिल्मची ताकद ही सामान्य बायोपॉलिमरपेक्षा कितीतरी अधिक आहे. कमी ताकद, पाण्यात जलद विरघळणारे अशा काही त्रुटींमुळे बायोपॉलिमरला प्राधान्य मिळत नव्हते. मात्र आता या नव्या शोधानंतर बायोपॉलिमरच्या वापरात मोठय़ा प्रमाणावर वाढ होण्याची अपेक्षा आहे.




























































