वेब न्यूज – टिकटॉकवर खटला दाखल

741

>> स्पायडरमॅन

जगभरातील अनेक देशांत प्रचंड लोकप्रिय असलेले आणि हिंदुस्थान, अमेरिकेसारख्या मोठय़ा देशांमध्ये तरुणाईला वेड लावणारे म्हणून टिकटॉक या ऑप्लिकेशनची ख्याती झाली आहे. या ऍपचे जगभरात 50 करोड ऑक्टिव्ह यूजर्स असल्याचे मानले जाते. या ऍपची लोकप्रियता एवढी आहे की, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये हरयाणामध्ये भाजपने टिकटॉक स्टार्सना मैदानात उतरवले होते. तामीळनाडूतील एका न्यायालयाने टिकटॉकवरती बंदी घालत अनेक ऍप स्टोअर्सवरून हे ऍप हटवण्याचे निर्देश दिले होते. या ऍपचा वापर करून अश्लील सामग्री प्रसारित केली जाते असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. मात्र आठवडय़ाभरानंतर ही बंदी उठवण्यात आली. आता मात्र कॅलिफोर्नियात एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया ‘मिस्टी हॉन्ग’ नावाच्या तरुणीने टिकटॉकवरती डाटा चोरल्याचा आरोप करून कॅलिफोर्नियातील एका न्यायालयात खटला दाखल केला आहे. हा डाटा चोरून चीनला पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोपदेखील तिच्याकडून करण्यात आला आहे. या खटल्यात दावा करण्यात आला आहे की, टिकटॉकची पॅरेंट कंपनी ‘बाइट डान्स’ असून तिचे मुख्य कार्यालय बीजिंगमध्ये आहे. ही कंपनी टिकटॉक ऍपच्या मदतीने अमेरिकन ग्राहकांचा महत्त्वाचा आणि वैयक्तिक डाटा चोरत असून तो चीनमधील सर्व्हरला ट्रान्सफर केला जात आहे. भविष्यात या डाटाचा वापर अमेरिकेच्या विरुद्ध केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिस्टी हॉन्गने सांगितले की, तिने आपल्या मोबाईलवरती टिकटॉक ऍप डाऊनलोड केले होते, पण त्यावरती स्वतःचे खाते बनवले नव्हते. मात्र काही दिवसांतच या ऍपने तिच्या मोबाईलमधील काही खासगी व्हिडीओ जे तिला प्रसारित करायचे नव्हते ते चोरले आणि अलिबाबा, टेनसेंट या कंपन्यांच्या चायनामधील सर्व्हरला पाठवून दिले. बाइट डान्स कंपनीने खूप आधीच आपण अमेरिकन यूजर्सचा डाटा चायनामधील सर्व्हरवरती साठवत नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता या नव्या आरोपानंतर आणि खटल्यानंतर कंपनीने कोणतीही टिपणी दिलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या