पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका, दहा महिन्यांत 21 लाख प्रवाशांकडून वसूल केला 146 कोटींचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांना दंडाचा चांगलाच दणका दिला आहे. गेल्या दहा महिन्यांत तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या तब्बल 21 लाख प्रवाशांवर कारवाई करत 146 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर एसी लोकलमध्येही 37 हजार 800 प्रवासी विनातिकीट आढळले होते. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली आहे.

रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार एप्रिल 2022 ते जानेवारी अखेरपर्यंत विक्रमी दंड वसूल केला आहे, तर केवळ जानेवारी महिन्यात 1 लाख 70 हजार प्रवाशांना 10 कोटी 83 लाख रुपये दंड आकारला आहे. मागील वर्षी दहा महिन्यांत 13 लाख 68 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत 80 कोटी रुपये दंड वसूल केला होता.